जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांसाठी दलालांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:37+5:302021-02-06T04:28:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांसाठी सध्या अनेक दलालांचा सुळसुळाट झाला आहे. या कार्यालयामार्फत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांसाठी सध्या अनेक दलालांचा सुळसुळाट झाला आहे. या कार्यालयामार्फत नव्या उद्योगांसाठी शासनाच्या योजनांच्या मार्फत कर्ज वितरीत केले जाते आणि त्याचे अनुदान देखील दिले जाते. मात्र सध्या काही दलाल अनेकांना फोन आणि मेसेजद्वारे प्रलोभन देण्यात येत आहे. त्यामुळे काहींची फसवणुक होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा उद्योग केंद्रातून बोलत असल्याची बतावणी करणारे फोन होतकरु तरुणांना जात आहे. त्यांना केंद्रशासनाच्या पीएमईजीपी (पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना) आणि सीएमईजीपी (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना) यांची माहिती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना अनुदानाचे प्रलोभन दाखवून त्या बदल्यात रकमेची मागणी देखील केली जाते. काही वेळा हे दलाल आपण जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी असल्याची बतावणी देखील करीत असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकाऱ्यांनी मात्र येथे कोणतेही दलाल नाहीत, हे स्पष्ट केले आहे. या अधिकाऱ्यांनी तरुणांना या दलालांच्या प्रलोभनांना बळी न पडता थेट उद्योग केंद्रात संपर्क साधावा, आणि अशा संदेशांना बळी पडु नये असे आवाहन केले आहे.
कोट - आमच्या कार्यालयाच्या नावाने परस्पर कुणालाही फोन केले जात नाहीत. ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे. त्यांनी कुणालाही दुरध्वनीवर किंवा कार्यालयाच्या बाहेर प्रत्यक्ष भेटू नये. त्या ऐवजी कार्यालयात थेट योग्य त्या संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा
- आर.आर.डोंगरे,व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.