‘एनिमा’साठीच्या काढ्याचे ‘जेल’मध्ये रूपांतर; जळगावचे वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी मिळविले पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:53 AM2019-05-17T05:53:45+5:302019-05-17T05:54:30+5:30
सलग तिसरे पेटंट मिळविणारे वैद्य नरेंद्र गुजराथी हे भारतातील पहिलेच संशोधक आहेत.
जळगाव : एनिमा घेण्याअगोदर प्रत्येक वैद्याला आयुर्वेदिक औषधींचा काढा करून तो रूग्णास द्यावा लागतो. यासाठीच्या क्लिष्ट पद्धतीतून आता सुटका होणार आहे. या काढ्याचे ‘जेल’मध्ये रूपांतर करण्याचे संशोधन जळगाव येथील वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले आहे. यासाठी त्यांना पेटंट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सलग तिसरे पेटंट मिळविणारे वैद्य नरेंद्र गुजराथी हे भारतातील पहिलेच संशोधक आहेत.
पोटाचे विकार, अर्धांगवायू यांसारख्या विकारांवर आयुर्वेदामध्ये एनिमा (बस्ति) द्यावा लागतो. त्यासाठी विविध औषधींचा काढा तयार करुन रूग्णास एनिमा दिला जातो. यासाठी बराच वेळ लागतो. तसेच ही पद्धती रूग्णाच्या दृष्टीने खर्चिकही असते. यातून रूग्णाची सुटका व्हावी, त्याचा व वैद्य अशा दोघांचा वेळ वाचावा, यासाठी वैद्य गुजराथी हे २००२ पासून संशोधन करत होते. यामुळे एनिमाचे शीघ्रतेने उपचार करणे तसेच औषधी दिर्घकाळ कमी मात्रेत साठा करणे सोपे झाले आहे. एनिमा घेण्यासाठी दवाखान्यात येण्याची गरज नाही.
सलग तिसरे पेटंट
वैद्य गुजराथी यांनी केलेल्या संशोधनास ‘अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ एनिमा कंपोझिशन’ या नावाने वैयक्तीक पेटंट मिळाले आहे. यापूर्वी २०१० व त्यानंतर २०१५ मध्येही त्यांनी आयुर्वेदातील उपचार पद्धतीत संशोधन करून पेटंट मिळविले आहे.
हे संशोधन रूग्णांना किफायतशिर व सरळतेने घेणे सोपे झाले आहे. त्याचा वापर वैद्य व रूग्णांना सहजतेने करता येणार आहे. वैद्यांसाठी हे संशोधन निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे. - वैद्य नरेंद्र गुजराथी, जळगाव