विकासासाठी सहकार शिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:13 PM2018-10-14T12:13:16+5:302018-10-14T12:16:40+5:30

सहकार भारती व जनता बँकेतर्फे सत्कार

Cooperation is not an option for development | विकासासाठी सहकार शिवाय पर्याय नाही

विकासासाठी सहकार शिवाय पर्याय नाही

Next
ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे प्रतिपादनसहकारातून मोठी रोजगार निर्मिती

जळगाव : देशाच्या विकासासाठी सहकार शिवाय पर्याय नाही. सहकार क्षेत्राची आता आपली व्याप्ती वाढविण्याची गरज असून इतर विविध क्षेत्रात ‘सहकार’ आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे संचालक तथा सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे यांनी येथे केले.
रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदावर मराठे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सहकार भारती व जनता सहकारी बँकेतर्फे त्यांचा सत्कार येथील नियोजन भवनात करण्यात आला. अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे होते. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, प्रदेश अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, जिल्हा अध्यक्ष विवेक पाटील, शहर अध्यक्षा अनिता वाणी, जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, माजी अध्यक्ष संजय बिर्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलीक पाटील यांची मुख्य उपस्थिती होती. मराठे यांचा सत्कार अशोक जैन यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून केले. सन्मापत्राचे वाचन विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाटील यांंनी केले.
सहकारातून मोठी रोजगार निर्मिती
यावेळी सतीश मराठे म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सहकारी बँका व सोसायट्या यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस सहाय्य मिळाले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आता विमा, विद्युत, परिवहन आदी नवनवीन क्षेत्रात काम व्हायला हवे, असेही ते म्हणाले. विश्वात भारतात सर्वात मोठे सहकार क्षेत्र आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. यामुळे सहकार क्षेत्रातील प्रत्येकाने न डगमगता जोमाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रातील सतीश मराठे हे आता निर्णय प्रक्रियेत असल्याने याचा लाभ निश्चित होईल. तसेच त्यांच्या उपस्थितीत आज जळगावात राज्यभरातील सहकार क्षेत्रातील २६ प्रतिनिधींची बैठक झाली. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना मिळाला.
सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे...
समाजात तीन संस्था काम करीत असतात. एक केवळ नफा मिळविण्यासाठी व दुसरी समाजसेवेसाठी तर तिसरी सहकार पद्धतीने. सहकार पद्धतीने काम करताना नफा कमविला जातो मात्र केवळ नफा कमविणे हा उद्देश नसतो तर समाजाची प्रगती हा हेतू असतो. आलेला नफा हा देखील समाजासाठीच उपयोगात आणला जातो. परंतु काही कारणांमुळे सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोना काहींचा चुकीचा झालेला आहे. तो बदलणे गरजेचे आहे, सहकारला अधिक बळ देण्याची गरज आहे,असेही मराठे म्हणाले.
चांगल्या योजना सुरु कराव्यात- अशोक जैन
सहकार क्षेत्रात बिकट स्थिती असून ती सावरण्यासाठी सहकार क्षेत्रातील सतीश मराठे यांनी आपल्या पदाचा उपयोग या क्षेत्रासाठी करुन देत चांगल्या योजना द्याव्यात, अशी विनंती अशोक जैन यांनी अध्यक्षीय भाषणातून केली. याचबरोबर प्रचंड प्रमाणात कर्ज बुडव्यांमुळे बॅँकींग क्षेत्रात भितीचे वातावरण आहे, यामुळे महत्वाची कामे प्रलंबित आहे. याचा फटका कारखानदारांना बसत आहे. यादृष्टीने रिझर्व्ह बँकेने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे, असे सांगून मराठे यांच्या कार्याचे जैन यांनी कौतुक केले.

Web Title: Cooperation is not an option for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव