समन्वय राखून कामे मार्गी लावणार : सीईओ एस. के. दिवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:14 PM2018-03-01T22:14:32+5:302018-03-01T22:14:32+5:30
अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांच्याकडून घेतला कार्यभार
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एस. के. दिवेकर यांनी १ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पदभार स्विकारला. जिल्हा परिषदेतील विविध प्रश्न सुरुवातीस समजून घेत सर्व विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्याशी समन्वय राखून अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
२८ रोजी प्रशासनाने बदलीचे आदेश दिल्यावर कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपला पदभार अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपवला होता. दिवेगावकर यांची बदली पुणे महानगर पालिकेत अतिरीक्त आयुक्त या रिक्त पदावर झाली आहे. तर मुंबई येथील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांची बदली दिवेगावकर यांच्या जागी जळगाव जि. प . च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली असून त्यांनी हा पदभार गुरुवारी मस्कर यांच्याकडून स्विकारला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांचा परिचय त्यांनी करुन घेत थोडक्यात आढावा घेतला.
खुलेपणाने काम करणार
यावेळी दिवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषद ही स्थानिका स्वराज्य संस्था असून लोकांचा व लोकप्रतिनिधींचा संपर्क याठिकाणी अधिक येतो. यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांशी तसेच अधिकाºयांशी समन्वय राखून कामे केली जातील. बंदीस्तपणे न राहता खुलेपणाने काम करण्याची आपली पद्धती असून शासनाच्या ध्येयधोरणाची तसेच योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामचुकारांना सोडणार नाही !
कामात चुका करणारे तसेच कामचुकार कर्मचाºयांवर दया दाखविली जाणार नाही तसेच चांगले काम करणाºयांचे कौतुकही करु, अशी भूमिकाही दिवेकर यांनी स्पष्ट केली. शिक्षण, आरोग्य, कृषी आदी सर्व विभागातील कामे वेळेतच कशी होतील यासाठी आपण दक्ष राहणार आहोत, असेही ते म्हणाले.