कॉप्यांचा पडला पाऊस अभियानाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:11 PM2020-03-04T12:11:57+5:302020-03-04T12:13:01+5:30
जळगाव : ‘कॉपी मुक्त’ अभियानाच्या सर्व उपाययोजना दहावीच्या परीक्षेतही फोल ठरल्याचे चित्र असून मंगळवारी पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला बहुतांश ...
जळगाव : ‘कॉपी मुक्त’ अभियानाच्या सर्व उपाययोजना दहावीच्या परीक्षेतही फोल ठरल्याचे चित्र असून मंगळवारी पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला बहुतांश परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा पाऊस पडला. बारावी परीक्षेप्रमाणे दहावीच्या ‘माय मराठी’च्या पेपरलाही मंगळवारी सर्रास कॉपी सुरू असल्याचे चित्र होते. दहा ते पंधरा फुटाच्या भिंतींवर चढून तरूणांकडून कॉपी पुरविण्यासाठी धडपड सुरू होती़ नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूने खिडक्यांमधून अक्षरश: कॉप्या बाहेर फेकल्या जात होत्या तर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मागील बाजूस चक्क कॉप्यांचा गठ्ठा घेवून तरूण फिरत होते़ तर याठिकाणी प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा तरूणांमध्ये सुरू होती़ मात्र, प्रत्यक्षात तसे काही दिसून आले नाही़
मंगळवारपासून दहावीच्या परीक्षाही प्रारंभ झाली़ सकाळी ११ वाजता पेपर असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर १०़३० वाजताच हजेरी लावली़ नंतर विद्यार्थ्यांची अंगझडती घेतल्यानंतर केंद्रात प्रवेश देण्यात आला़ तासभर परीक्षा केंद्रांवर मराठी विषयाचा पेपर सुरळीत चालला़ मात्र, दुपारी १२ वाजेनंतर बहुतांश केंद्रांवर अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला़ केंद्र आवारात जरी शांतता असली तर वर्गांमध्ये सर्रास कॉपी सुरू होती़
पत्रावर चढवून पुरविली कॉपी
नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूला कॉपी पुरविण्यासाठी तरूणांची दुपारी १ वाजता चांगलीच गर्दी झाली होती़ यात तरूणांनी चक्क दहा ते पंधरा फुटाच्या उंचीच्या पत्रांंवर चढून कॉपी पुरवित होते़ दुसरीकडे काही तरूण दगडात कॉपी अडकवून खिडक्यांच्या दिशेने फेकत होता़ प्रकार कळताच केंद्र संचालकांनी पोलिसांना माहिती दिली़ व पोलिसांचे पथक विद्यालयात धडकले होते़ दरम्यान, खिडक््यांमधूनही कॉपी केल्यानंतर कागदांंचा पाऊस पडताना दिसून आला़
कॉपी पुरविणाऱ्यांनी टोकली धूम
नूतन मराठा महाविद्यालय, गुळवे विद्यालय तसेच अँग्लो उर्दू विद्यालयाच्या परिसरात कॉपी पुरविण्यासाठी अनेकांनी चांगलीच गर्दी केली होती़ मात्र, केंद्रसंचालकांकडून याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी मंजुळा तिवारी,उषा सोनवणे तसेच जिल्हापेठ पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात गस्त लावत तरुणांना पिटाळून लावले़ गुळवे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तरुणांनी गर्दी केली होती़ त्याच क्षणी जिल्हापेठ पोलिसांचे डिबी पथक येताच त्या तरुणांनी तेथून पळ काढला़ दरम्यान, पथकाने तब्बल तीनशे ते चारशे मीटरपर्यंत त्या तरूणांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावले़
गाईड घेऊन फिरत होते तरूण
शहरातील अँग्लो उर्दु हायस्कूलच्या मागील बाजूने काही तरूणांकडून कॉपी पुरविण्यासाठी कसरती सुरू होत्या़ त्यातच एका तरूणाच्या हातात चक्क कॉप्यांची गड्डी होती़ परिसरात पोलीस नसल्यामुळे हे तरूण बिनधास्त कॉपी हातात घेऊन मिरवताना दिसून आले़ नंतर अधून-मधून संधी साधत भिंतींवर चढून कॉपी पुरवताना दिसले़ खुबचंद सागरमल विद्यालयाच्या भिंतीवर चढून कॉपी पुरविण्यासाठी तरूणांच्या कसरती सुरू असल्याचे दिसून आले़