दहावीच्या मराठी पेपरला कॉपी; यावल येथे एका विद्यार्थ्यावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 01:02 AM2024-03-02T01:02:58+5:302024-03-02T01:20:36+5:30
विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी दिली
जळगाव : माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या परीक्षेची सुरूवात शुक्रवार दि.१ रोजी मराठीच्या पेपरने झाली. शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी उपायोजना, नियोजन तसेच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मराठीच्या पेपरला जळगाव शहरासह अन्य ठिकाणी कॉपी झाल्याचे दिसून आले. भरारी पथकाने यावल येथील एका परीक्षा केंद्रावर केलेल्या पाहणीत एका विद्यार्थ्यावर कॉपीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील १४३ परीक्षा केंद्रांमध्ये १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. शुक्रवार दि. १ रोजी, ५० हजार ५८१ विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. मात्र, पहिल्याच पेपरला जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी झाली. भरारी पथकाला यावल येथील झाकीर हुसेन माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर पाहणी करताना एका विद्यार्थ्याजवळ परीक्षा देताना कॉपी असल्याचे आढळून आले. या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी दिली. या विद्यार्थ्याचे नाव देण्यात आलेले नाही. दरम्यान, जळगाव शहरात गैरप्रकाराची एकही नोंद झाली नसल्याचे रागिणी चव्हाण यांनी सांगितले.