‘कोरोना’चा शेतीलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 02:24 PM2020-05-25T14:24:05+5:302020-05-25T14:25:07+5:30
कोरोनाचा सुप्त प्रभाव टिकून राहण्याची भीती केळी उत्पादकांमधून व्यक्त होत असल्याने केळी लागवडीत घट होण्याची शक्यता आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : गतवर्षी कापसाचे उत्पादन निम्म्यावर घटल्याने यंदा जिरायत व बागायत कापसाची लागवड आठ हजार हेक्टरने, तर रब्बीतील मका उत्पादनाची झालेली मातीमोल परवड पाहता मक्याचे क्षेत्र तीन हजार २५१ हेक्टरने खरीप पीक घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यंदा केळीबागांचे उत्पादन गुणात्मक दर्जाचे असता नव्हे तर काहींनी निर्यातीचे फळनिगा तंत्र अवलंबूनही कोरोनाच्या बागूल बुवात उत्पादन खर्च खिशात पडला नसल्याने केळी लागवडीत घट निर्माण होण्याची शक्यता असून, हळद व अद्रक उत्पादनाकडे केळी उत्पादक शेतकरी वळण्याची दाट शक्यता आहे.
रावेर तालुक्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार २१५ हेक्टर आहे. त्यात २८ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. उर्वरित क्षेत्रात केळी, ऊस, हळद, अद्रक आदी बागायती क्षेत्राचा समावेश राहील.
तथापि, ‘मे हिट’चा तडाखा ऐन उत्तरार्धात ४६ सेल्सिअंशावर सूर्य आग आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ‘मे हिट’ची भर पडल्याने रस्ते निर्मनुष्य होऊन शेतीशिवारातील पूर्व हंगामी कापूस लागवड व खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीवर विपरित परिणाम झाला आहे. प्रचंड उष्मा व कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पूर्व हंगामी कापूस लागवडीला यावर्षी गत वर्षीच्या तुलनेत उशीर झाला आहे. गतवर्षी कापसाच्या डबल बीटी बियाण्यांची लागवड करूनही व उत्पादन खर्च भरमसाठ करूनही बागायती कापसाचे उत्पन्न जिरायत कापसाप्रमाणे आल्याने तर जिरायत कापसाचे त्याहून निम्मे आल्याने तथा कापूस लागवडीचा हंगाम येईपर्यंत मागील वर्षाचे उत्पादन घरात पडून असल्याने यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाचा अंदाज आहे. बागायती कापसाचे एक हजार ३५२ हेक्टर तर जिरायत कापसाचे ६ हजार ७२० हेक्टर असे एकूण ८ हजार ७२ हेक्टर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, रब्बी हंगामात मक्याच्या उत्पादनाला मातीमोल भावाने विकावे लागल्याने यंदा खरिपाच्या मक्याच्या लागवडीतही तीन हजार २५१ हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचा बागुल बुवा करून केळी व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाच्या केळी मालीचीही धुळघाण केल्याने व कोरोनाच्या सावटाची अनिश्चितता गृहीत धरून बहुतांशी केळी उत्पादक हळद व अद्रक उत्पादनाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कापसाच्या उत्पादनाचे भिजत घोंगडे पडून असल्याने शेतकऱ्यांना ज्वारी, मका, कडधान्य व तेलबिया पिकांकडे वळण्याची गरज आहे. अतिउष्ण तपमान व बियाण्यांची उशिराने होणारी उपलब्धता पाहता कापसाच्या लागवडीत घट होण्याचा अंदाज आहे. कोरोनाचा सुप्त प्रभाव टिकून राहण्याची भीती केळी उत्पादकांमधून व्यक्त होत असल्याने केळी लागवडीत घट होण्याची शक्यता आहे.
-एस.आर.साळुंखे, तालुका कृषी अधिकारी, रावेर