कोरोनाने खाल्ला बाप्पाचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:18 AM2021-09-19T04:18:01+5:302021-09-19T04:18:01+5:30
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणरायाच्या दर्शनासह मंडळांच्या भंडाऱ्यांवर बंधने आल्याने प्रसादाचे साहित्य तसेच मसाल्याच्या मागणीत घट झाल्याचे ...
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणरायाच्या दर्शनासह मंडळांच्या भंडाऱ्यांवर बंधने आल्याने प्रसादाचे साहित्य तसेच मसाल्याच्या मागणीत घट झाल्याचे व्यावसायिकांच्यावतीने सांगण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी गणेश भक्तांच्या उत्साहावर कोरोनामुळे विघ्न येत असल्याने पुढील वर्ष सुखवार्ता घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरला आणि सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. यामध्ये कोरोनामुळे अनेक दिवस बाजारपेठ बंद राहण्यासह सण-उत्सवांवरदेखील मोठा परिणाम झाला. यात गेल्या वर्षी नेमके गणेशोत्सवाच्या काळात, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच कोरोनाचा अधिक संसर्ग होता. त्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झाला. त्यानंतर यंदा गेल्यावर्षाच्या तुलनेत काहीसा उत्साह वाढला आहे. मात्र गणेश भक्तांना मंडळाच्या ठिकाणी दर्शनासाठी परवानगी नसल्याने हिरमोड होत आहे.
प्रसाद वाटायचा कोणाला?
बाप्पाचे दर्शन, आरास पाहण्यासाठी शहरवासीय गणेश मंडळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे त्यांना तेथे प्रसाददेखील वाटप केला जातो. यामध्ये खोबऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. शिवाय अनेक ठिकाणी सुकामेवादेखील प्रसादात असतो. त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाच्या काळात खोबरे, सुकामेवा, साखर यांना मागणी वाढले. मात्र, गेल्या वर्षापासून बंधनामुळे गणेशभक्तच मंडळाच्या ठिकाणी येत नसल्याने प्रसाद वाटपही कमी झाले आहे. त्यामुळे खोबऱ्याची मागणी कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. दरवर्षी साधारण एक ते दीड क्विंटल खोबऱ्याची या दिवसात विक्री होते, मात्र यंदा ती निम्म्यावर आली आहे.
भंडाऱ्याअभावी मसाल्याच्या मागणी घट
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांच्यावतीने भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. यासाठी गंगाफळ अथवा वांगे, मसाले यांची खरेदी वाढते. सोबत धान्यही असतेच, मात्र अनेक ठिकाणी ते सर्व मिळून आणतात. मात्र, भंडाऱ्यासाठी भाजीपाला, मसाले यांची खरेदी करावीच लागते. मात्र यंदा बंधनांमुळे भंडाऱ्यांचीही संख्या जवळपास नसल्यासारखीच आहे. त्यामुळे मसाल्याची व भाजीपाल्याची मागणीदेखील कमी झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात प्रसादासाठी खोबरे, सुकामेवा यांना चांगली मागणी असते. तसेच भंडाऱ्यासाठी मसाल्यांनाही मागणी वाढते. मात्र दोन वर्षांपासून बंधने आले व या मागणीत घट झाली आहे.
- सचिन जैन, सुकामेवा, मसाले विक्रेते.