कोरोनाने हिरावले सात मुलांचे आई-वडील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:51+5:302021-05-27T04:17:51+5:30
कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या - मुले ३ मुली ४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव ...
कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या -
मुले ३
मुली ४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. फेब्रुवारीपासून आलेल्या दुसऱ्या लाटेत तर रुग्णांची संख्या आणि मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात सात मुलांनी कोरोनामुळे दोन्ही पालक गमावले आहेत. आता सरकार त्यांची मदत करण्यास पुढे आले आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने या मुलांना सहकार्य केले जाणार आहे. १४ वर्षांच्या आतील मुलांना आर्थिक मदत आणि त्यावरील मुलांचे समुपदेशन, त्यांना मानसिक आधारदेखील दिला जाईल.
आई-वडिलांचे छत्र कोरोनाने हिरावून नेले. आता जिल्हास्तरीय महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हास्तरीय कृती दल या मुलांवर मायेची पाखर घालणार आहे. कोरोनाने दोन्ही पालक हिरावलेली सात बालके असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे आहे. त्यातील तीनजण जळगावचे, तर चोपडा आणि सावदा येथील दोनजण असल्याची माहिती आहे. या आठही मुलांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना मानसिक धीर दिला जात आहे. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मदतीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुळे आई-वडिलांना गमावलेल्या मुलांची माहिती सध्या जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग संकलित करीत आहेत. त्यातून या सात मुलांची नावे विभागाकडे आली आहेत. त्यात चार मुली आणि तीन मुले आहे. यातील दोनजण हे १८ वर्षांवरील आहेत. त्यांना करिअर मार्गदर्शन, मानसिक आधार आणि समुपदेशन केले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने दोन्ही पालक गमाविलेल्या मुलांच्या सहकार्यासाठी तालुका महिला व बालविकास अधिकारी, गटविकास अधिकारी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा महिला व बालकल्याण विभाग त्यांच्या मदतीने प्रस्तावदेखील तयार करणार आहे.
आई-वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत
कोरोनामुळे आई आणि वडील यांचा मृत्यू झाला असल्यास मुलांना दर महा ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. लवकरच विभागातर्फे त्यांचे प्रस्ताव तयार केले जाणार आहे. त्यानुसार १४ वर्षांआतील मुलांना ही आर्थिक मदत मिळू शकेल.
अनाथ मुलांना मिळणार सहकार्य
सरकार जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून १४ वर्षांआतील मुलांना आर्थिक सहकार्य आणि त्यापुढील मुलांना समुपदेशन, मार्गदर्शन, मानसिक आधार अशी मदत करणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सात मुले समोर आली आहेत.
कोट - जिल्ह्यात आतापर्यंत सात मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या सातही मुलांना आम्ही सर्वतोपरी मदत करीत आहोत. तसेच त्याशिवाय जिल्ह्यात आणखी अशा काही घटना आहेत का, आणखी काही मुले कोरोनामुळे अनाथ झाली आहेत का, याची तपासणी करीत आहोत - विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.