सालारनगर, कंजरवाड्यात कोरोनाचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:05 PM2020-05-29T12:05:36+5:302020-05-29T12:06:17+5:30
शहरात नवे १७ रुग्ण : सालारनगरातील ८ जणांचा समावेश, कंजरवाड्यातील एकाच कुटुंबातील चार बाधित
जळगाव : शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना गुरूवारीही शहरात कोरोनाचे १७ नवीन रुग्ण आढळून आले़ यातील सालार नगरातील ८ व कंजरवाडा (जाखणीनगर) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे़ हे बाराही रुग्ण बाधित रुग्णांच्या संपर्कातील असून त्यांना आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते़ यासह ग्रामीण भागात कुसुंबा व उमाळा येथे नवीन रुग्ण तर विटनेर येथे बाधिताच्या संपर्कातील एक असे तीन रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत़
कोळीवाडा येथे एक महिला, डहाके नगर मध्ये पुरूष, दक्षता नगरात एक तर तांबापूरात बाधित मृताच्या संपर्कातील दोघे पॉझिटीव्ह आढळून आलेले आहे़ उमाळा येथील महिला व विटनेर येथील बाधित डॉक्टर दाम्पत्याच्या संपर्कातील एक व भोकर येथील मृत बाधिताच संपर्कातील तीन जण पॉझिीटीव्ह आढळून आलेले आहेत़ यासह कुसुंबा येथील ४८ वर्षीय प्रौढही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे़ त्यामुळे जळगावच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १४ वर पोहचली आहे़
कंजरवाड्यात पुरेशा प्रमाणात उपाय होईना
कंजरवाड्यात बाधित वृद्धाच्या संपर्कातील त्याचे चारही नातेवाईक पॉझिटीव्ह आले आहेत़ यात ४ वर्षाचा मुलगा, ८ वर्षाची मुलगी, ३६ वर्षाची महिला व ३९ वर्षाचा तरूणाचा समावेश आहे़ दरम्यान, पहिला बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंजरवाडा येथे पुरेशा प्रमाणात उपाययोजना राबविण्यात आल्या नव्हत्या अशा तक्रारी समोर आल्या होत्या़ यातून संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचे बोलले जात होते़ प्रशासनाने या दाट वस्तीच्या भागाकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी समोर येत आहे़
सालारनगरात संसर्ग वाढला
सालारनगरात ८ रुग्णांपैकी दोन पुरूष, तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे़ यात २९ वर्षीय तरूण, ३३ वर्षीय तरूण, ८ वर्षाचा मुलगा, २८ वषीय महिला, २३ वर्षीय तरूणी, ७ वर्षांची मुलगी, २७ वर्षांची महिला, १२ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे़ हे सर्व रुग्ण कोविड सेंटरमध्ये आधीच क्वारंटाईन आहेत.
२५ जणांना डिस्चार्ज
गुरूवारी कोरोनातून मुक्त झालेल्या २५ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम रावलानी यांनी दिली़ एका दिवसात सर्वाधिक कोरोनावर मात केलेल्यांना घरी सोडण्यात आले़ यामुळे शहराला काहीसा दिलासा मिळणार आहे़
कंजरवाड्यात सायंकाळी घेतला मृत वृद्धाचा स्वॅब
कंजरवाड्यात दोन जणांचा गुरूवारी मृत्यू झाला़ यातील एका ५० वर्षीय प्रौढाला रुग्णालायात दाखल केल्यानंतर तर एका ६५ वर्षीय वृद्धाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला़ मात्र, यापैकी कोणाचेही कोविड रुग्णालयात नमुने तपासणीसाठी घेण्यात आले नव्हते व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यात आले होते़ यापैकी ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू हा यकूत खराब असल्याने झाल्याचे सांगत निकषात बसत नसल्याने नमुने घेण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आले़ मात्र, दुसऱ्या वृद्धाच्या मृत्यूच्या बाबतीत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अखेर सायंकाळी महापालिकेच्या पथकाने घरी जावून या मृत वृद्धाचे स्वॅब घेतले़ दोघेही मृत व्यक्ति या आधी बाधित आढळून आलेल्या वृद्धाच्या शेजारी राहत होते़ त्यानंतर नागरिकांनी तक्रार केल्या, काही प्रमाणात गोंधळाचेही वातावरण निर्माण झाले होते़ अखेर महापालिकेच्या प्रशासनाने सायंकाळी हे स्वॅब घेतले व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ यातील ५० वर्षाच्या प्रौढावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते़ दरम्यान, नातेवाईकांनी शवविच्छेदनाची मागणी केली होती़ मात्र, रुग्णालयाने ती न मान्य करता मृतदेह प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये सोपवून दिल्याचे सांगण्यात येत आहे़
बाधिताच्या पत्नीचे रुग्णालयातून रात्री पलायन
शिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथील बारी नगरात बुधवारी बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची पत्नी व इतर सात नातेवाईकांना बुधवारी रात्रीच कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र या महिलेने रात्री १० वाजेच्या सुमारास शिरसोली गाठल्याने अधिकच भिती पसरली. सकाळी हा प्रकार सकाळी पोलीस पाटील व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून या महिलेची कोविड रुग्णालयात रवानगी केली. ही महिला रात्री घरी कशी परतली याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
महिलेचे मुंबईहून उपचार
उमाळा येथील ५२ वर्षीय महिलेला कर्करोग असून या महिलेचे मुंबई येथे उपचार सुरू होते़ महिला चेंबूर येथे त्यांच्या नातवाईकांकडे राहिली होती़ त्यांचे नातेवाईक बाधित आढळून आले होते़ महिलेला जळगावात क्वारंटाईन करण्यात आले होते़ गुरूवारी अहवाल प्राप्त झाले़
८६१ अहवालांची प्रतीक्षा
जिल्हाभरात प्रलंबीत अहवालांची संख्या वाढतच आहे़ त्यात गुरूवारी ८९२ लोकांची नमुने तपासणीसाठी घेण्यात आले़ त्यामुळे एकत्रित ८६१ अहवाल प्रलंबीत आहेत़ त्यामुळे प्रयोगशाळेवरील भार अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आह़े विविध हॉटस्पॉट ठरलेल्या भागात तपासणीची संख्या वाढविली आहे़