कोरोना बॉम्ब फिरताय रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:18+5:302021-04-17T04:15:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लक्षणेविरहीत रुग्णांचा सर्रास बाजारपेठा, रस्त्यांवरील वावर हा कोरोना रुग्ण वाढीसाठी महत्वाचे कारण ठरत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लक्षणेविरहीत रुग्णांचा सर्रास बाजारपेठा, रस्त्यांवरील वावर हा कोरोना रुग्ण वाढीसाठी महत्वाचे कारण ठरत आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यांवर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली असून यात नियमीत अनेक जण बाधित आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना बाॅम्ब रस्त्यावर फिरताहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
जळगाव शहरात बाजारपेठेतील गर्दी, लग्नसोहळ्यांमधील गर्दी, राजकीय कार्यक्रम, ग्रामपंचायतीच्या निवडणुका अशा विविध कारणांनी कोरोनाचा उद्रेक झाल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तविला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णांना अगदी सामान्य लक्षणे असतात किंवा लक्षणेही नसतात. असे रुग्ण हे अधिक धोकादायक असतात. हे नागरिक कोरोना स्प्रेडर म्हणून संबोधले जातात. त्यांच्यामुळे ज्याची प्रतिकारक्षमता कमी किंवा अन्य व्याधी असणाऱ्या व्यक्तींना थेट जीवाचा धोका उद्भवू शकतो. जळगाव शहरात गेल्या तीन रात्रीत तीन ते चार वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांची अचानक तपासणी करण्यात येत आहे. शहरात यात पाच जण बाधित आढळून आले आहे. दुचाकीवर फिरणाऱ्या कोरोना स्प्रेडरला आपल्याला कोरोना आहे हे माहित नव्हते. त्यांची तपासणी केली नसती तर ते सर्वत्र कोरोना वाटत फिरले असते. ७० जणांच्या तपासणी तीन जण रस्त्यावर बाधित आढळून येणे याचा अर्थ कोराचा संसर्ग सर्वत्र झाला असून विना मास्क बाहेर फिरणे म्हणजे कोरोना सोबत घेऊन येणे असेच चित्र सर्वत्र आहे.
या ठिकाणी आढळले कोरोना पाॅझिटिव्ह
बोदवड २२
जळगाव शहर ५
रावेर ४
चोपडा १
म्हणून मास्क बंधनकारक
योग्य प्रकारे मास्क परिधान केल्यानंतर कोरोनाचा धोका कमी होतो. शिवाय कोरोनाचा संसर्ग हा जेवढ्या परिघात होतो. त्यापेक्षा अधिक अंतर पाळून कोणाशी संवाद केला तर कोरोनाचा धोका कमी होतो. त्यामुळे ज्यांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी हे नियम पाळावेत, असे वारंवार सांगितले जाते. कारण बाहेर कोणालाही कोरोना असू शकतो हे अचानक केलेल्या तपासणीतून समोर आले आहे.