कोरोनामुळे ‘देऊळबंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:22+5:302021-04-27T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहरातील विविध मंदिरे, मशीद व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहरातील विविध मंदिरे, मशीद व चर्चही बंद आहेत. त्यामुळे सध्या दैनंदिन पूजाविधीसाठीच मंदिरे उघडण्यात येत असून, त्यानंतर मंदिरे बंद केली जात असल्याची माहिती शहरातील विविध मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली, तसेच सध्या रमजान महिना सुरू असतानाही मशीद बंद असून, फक्त नमाजपठण करण्यापुरतीच ती उघडण्यात येत आहे. शहरातील सर्व धार्मिक स्थळी प्रशासनातर्फे शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत असून, शासनाच्या परवानगीनंतरच आम्ही ही धार्मिक स्थळे उघडणार असल्याची माहिती तेथील प्रशासनातर्फे देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षाप्रमाणे यंदादेखील शासनाने सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर, चिमुकले राममंदिर, ओंकारेश्वर मंदिर यासह शहरातील विविध मशिदी व सर्व चर्च बंद ठेवण्यात आले आहेत. शासनाच्या सूचनेनुसार मंदिरातील सकाळ व सायंकाळच्या दैनंदिन पूजाविधी व आरतीसाठी मंदिरे उघडण्यात येत आहेत. या पूजाविधीसाठीही मंदिरात फक्त पाच जणांना उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूजाविधीनंतर तात्काळ मंदिरे बंद करण्यात येत आहेत. कुठल्याही प्रकारचा धार्मिक उत्सव किंवा सण असला तरी फक्त पूजेसाठीच मंदिरे उघडण्यात येत असून, भाविकांना कोरोनामुळे दर्शनाची सुविधा बंद असल्याचेही विविध मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर बंदच आहे. फक्त सकाळ आणि संध्याकाळ दैनंदिन पूजा व आरतीसाठी मंदिरे उघडली जातात. कुणालाही दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही. जोपर्यंत शासनाचा आदेश आहे, तोपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंदच ठेवणार आहोत.
-दीपक जोशी, व्यवस्थापक, ओंकारेश्वर मंदिर देवस्थान