खानापूरला प्रतिबंधित क्षेत्रांचा बोजवारा उडाल्याने कोरोनाची साखळी आता १२ रुग्णांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:13 PM2020-06-21T17:13:11+5:302020-06-21T17:14:08+5:30
कोरोना बाधितांची साखळी आता १२ वर पोहोचत आहे.
किरण चौधरी
रावेर : तालुक्यातील खानापूर येथील बसथांबा परिसर व सप्तशृंंगी नगर भागातील सहा कोरोना बाधित रूग्ण सापडल्यानंतर गावातील सप्तशृंंगी नगर, पीक संरक्षण सह सोसायटी परिसर व माळीवाडा परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढले असून, कोरोना बाधितांची साखळी आता १२ वर पोहोचत आहे.
वाघोड आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक दिनेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आशावर्कर तथा अंगणवाडी सेविका यांच्या पल्सआॅक्सीमीटरद्वारे केलेल्या सर्व्हेक्षणाअंती सहा संशयित रूग्ण कोरोना बाधित निघाल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. ग्रा.पं.प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरोना बाघित रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रांचा बोजवारा उडाल्याने गावातील कोरोना बाधितांची साखळी वाढत चालली आहे. ग्रामस्थांचे आरोग्य व्हेंटीलेटरवर लागल्याची संतप्त टीका ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
खानापूर गावातील बसथांबा परिसरात असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेने रावेर शहरातील जिजाऊ नगर भागात घरकामासाठी रोजंदारीने जावून कोरोनाचे लोण गावात आणले. दोघही नात आजी कोरोनामुक्त झाल्या. पण त्यांचा प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त ग्रा.पं.ने मंडपाचा केवळ एक आडवा पाईप लावून केला होता. किंबहुना बसथांबा परिसरात ग्रामस्थांचा वाढता वापर असल्याने त्या प्रतिबंधित क्षेत्रातील सुदृढ तब्येत असलेल्या वा कोणतेही लक्षण नसलेल्या एखादया अदृश्य स्वरूपातील कोरोना वाहकाकडून गावात हळूहळू कोरोनाचे संक्रमण पसरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. फैजपूर कोव्हीड इंसिडन्ट कमांडंट डॉ अजित थोरबोले यांनी प्रतिबंधित क्षेत्राची नाकाबंदी पाहून ग्रा पं चे ग्रामविकास अधिकारी व्ही के महाजन यांची कानउघाडणी केली होती. मात्र ग्रा पं प्रशासनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाल्याचे चित्र नाही.
ग्रा.पं.कडून नागरिकांसह आरोग्य यंत्रणे सुविधा न पुरवल्यास स्क्रिनींगच्या सर्व्हेक्षणावर बहिष्कार टाकण्याच्या संतप्त भावना आशावर्कर व अंगणवाडी सेविकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांना दिला आहे. किंबहुना, शासनाकडून प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रासाठी ग्रा.पं.वा न.पा.सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतंत्र निधी दिला जात असताना संबंधित ग्रा.पं.प्रशासनाकडून नाकाबंदीसह आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले जात नसेल तर तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, सरपंच अमिना तडवी, आरोग्य सहाय्यक दिनेश चौधरी, तलाठी बी.एन.वानखेडे, पोलीस पाटील दीपक महाजन, ग्रा.पं.सदस्य मोहन धांडे आदी उपस्थित होते.