कोरोनानंतर बदलले घरातले किचन, हेल्दी फूडकडे वाढला ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:20+5:302021-06-16T04:21:20+5:30

फळांचा वापर वाढला, फास्ट फूडला घरात नो एन्ट्री लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या ...

Corona changed home after corona, increased trend towards healthy food | कोरोनानंतर बदलले घरातले किचन, हेल्दी फूडकडे वाढला ओढा

कोरोनानंतर बदलले घरातले किचन, हेल्दी फूडकडे वाढला ओढा

Next

फळांचा वापर वाढला, फास्ट फूडला घरात नो एन्ट्री

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. या महामारीच्या काळात सर्वकाही बदलले. त्यासोबतच किचनमधील पदार्थांमध्येदेखील चांगलाच बदल झाला आहे. महामारीच्या काळात घराघरांमध्ये फळांचा वापर वाढला तर फास्ट फूडला अनेकांनी घराबाहेर काढले आहे.

मार्च २०२० मध्ये पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांची संख्या आता दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. अनेक कुटुंबांना कोरोनाने उदध्वस्त केले. त्यामुळे आता नागरिकदेखील जागरूक झाले आहेत. अनेक घरांमध्ये गृहिणी फास्ट फूडपेक्षा सकस अन्नावर भर देत आहेत. तसेच प्रोटीन आणि व्हिटामिन सीचा समावेश असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केला जात आहे.

काय असावे आहारात?

आहारात आवळा, तुळस, ज्येष्ठमध, ब्राम्ही या चूर्ण प्रमाणात घ्याव्यात, ओल्या नारळाचे दूध, गायीचे दूध, शिंगाडा पीठ, सर्व प्रकारची फळे, सध्या जांभूळ, नारळाचे पाणी, केळी यांचा आहारात समावेश असावा. ज्वारीची भाकरी यांचे प्रमाण वाढवावे, मल्टी ग्रेन पदार्थदेखील शरीराला उपयुक्त ठरतील. गव्हाची पोळी आणि भात यांचे प्रमाण कमी ठेवावे, तसेच साखर आणि मीठ यांचे प्रमाण कमी असावे. आपल्या मातीत जे पिकते त्याचा वापर आहारात जास्तीत जास्त असावा. शरीरासाठी अपायकारक पदार्थ कमी खावेत, ओलावा असेल अशा पदार्थांचा वापर वाढवावा. तसेच दररोज सकाळी नियमित व्यायाम करावा, असे मत आयुर्वेदतज्ज्ञ सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

कोट -

गेल्या वर्षभरापासून आम्ही बाहेरचे खाणे बंद केले आहे. त्याऐवजी घरातच सर्व पदार्थ बनवण्यावर भर देत आहोत. सकस आणि पचायला हलके आणि सर्व प्रकारच्या फळांचा वापर आम्ही आहारात केला आहे. - भाग्यश्री माहुरकर

फास्ट फूडच्या वापराने आरोग्याला निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता आम्ही आता फास्ट फूडचा वापर बंद केला आहे. आहारात केळी, टरबूज, पपई तसेच जांभूळ या फळांचा वापर सुरू केला आहे. त्याचा फायदादेखील दिसून आला आहे. - जयश्री अकोले

सध्याच्या काळात आहारात दाळी व इतर प्रोटीनयुक्त आहार तसेच व्हिटामिनची पूर्तता करणारी फळे यांचा समावेश केला आहे. गेल्या वर्षभरापासून फास्टफूड बंद केले. जे खायचे ते आम्ही घरीच तयार करतो. - माधुरी गावंडे

Web Title: Corona changed home after corona, increased trend towards healthy food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.