‘कोरोना’ची तपासणी : दुबईहून आलेले दीपनगरचे दोघेही ‘नॉर्मल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:34 PM2020-03-14T13:34:20+5:302020-03-14T13:34:50+5:30
एकही संशयित नाही
जळगाव : दीपनगर येथे दुबई येथून परतलेल्या दोघा पुरूषांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ या दोघांची तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून शुक्रवारी तसा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोपविला़ दरम्यान, जिल्ह्यात एकही संशयित रूग्ण नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी दिली आहे़
दीपनगर येथील दोन पुरूष हे २८ फेब्रुवारी रोजी दुबई येथून परतले होते़ याबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांची तपासणी करण्याचे आदेश गुरूवारी दिले होते़ त्यानंतर डॉ़ बाळासाहेब वाबळे यांनी शुक्रवारी या दोघांची तपासणी केली असता त्यांना कसलीच लक्षणे नसून ते दोघेही सामान्य असल्याचे त्यांनी कळविले आहे़ आरोग्य विभाग या दोघांवर लक्ष ठेवून आहे़
स्वतंत्र वार्डसाठी पत्र देणार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेला कोरोनासाठीचा स्वतंत्र वार्ड हा अगदीच गजबजलेल्या ठिकाणी असून यात पुरेशा रूग्णांची व्यवस्था नाही, यासाठी डीईआयसीच्या इमारतीत ५० खाटांचा एक स्वतंत्र कक्ष करावा, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण हे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांना पत्र देणार असल्याची माहिती आहे़
जि.प. सदस्यांचा केरळ दौरा पुढे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद सदस्य व अधिकाºयांचा केरळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे़ २२ मार्च रोजी हा दौरा होता़ दौरा पुढे ढकलण्याबाबत ग्रामपंचायत विभागाला मोबाईलवर सूचना मिळालेल्या आहेत़ दुसरीकडे मात्र, अध्यक्षा व काही सदस्यांच्या कोकण दौºयाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळते़
सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नाही
भुसावळ येथील एका तरूणीला कोरोना संशयावरून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते़ मात्र, तसा कुठलाही रूग्ण कोरोना वार्डात अद्याप दाखल झाला नसल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले असून संशयित रूग्ण कोणाला म्हणायचे? याच्या सूचना आधीच सर्वांना दिल्या असल्याने प्रत्येक सर्दी, खोकल्याचा रूग्ण हा संशयित नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़
ज्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत़ ज्यांचा परदेशाची थेट संपर्क असतो, अशा शहरात हे क्वारंटाईन अर्थात परदेशातून आलेल्यांसाठीचा स्वतंत्र वार्ड आहे़ रूग्णांना विमान तळावरच तपासून मोठ्या शहरात क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते़ आपल्याकडे आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज असून हॉटेल्स, ट्रॅव्हल कंपन्या यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून विदेशात जाणाºया व येणाºयांच्या याद्या मागवून तपासणी करण्यात येत आहे़
- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,