‘ट्रीपल टी’च्या माध्यमातून मिळविणार कोरोनावर नियंत्रण - जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:49 PM2020-06-25T12:49:24+5:302020-06-25T12:49:52+5:30
संशयित रुग्ण तपासणी पंधरवाड्यात मृत्यूदरही कमी करण्यासाठी उपाययोजना
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरीत तपासणी त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट अशा ट्रीपल ‘टी’) या तत्वांचा अवलंब करीत कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यामध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली.
मृत्यूदर होईल कमी
रुग्णाचे लवकर निदान झाले नाही तर त्याच्या मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे या पंधरवाड्यामध्ये मृत्यूदर कमी करण्यावर भर राहणार असल्याने तत्काळ निदान होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात येणार आहे. यात निदान लवकर झाल्यास त्वरीत तपासणी करण्यात येऊन त्यावर काय उपचार करणे आवश्यक आहे हे समोर येईल व त्यानुसार त्वरित उपचार मिळतील. त्यामुळे त्वरीत निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रीपल टी) यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
रुग्णालयात सुविधांवर भर व रुग्णांची काळजी
कोरोना रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देत रुग्णालयाची कार्यक्षमता वाढविण्यात येत असून यात वेगाने सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या सोबतच तेथे डॉक्टरांची नियुक्ती, त्यांनी तेथे हजर राहून रुग्णांजवळ थांबणे गरजेचे असल्याचे सांगत तशा उपाययोजना यंत्रणेमार्फत राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
रुग्णांची माहिती घेणार
या पंधरवाड्यामध्ये मनपाची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणारे वेगवेगळ््या आजाराच्या रुग्णांची माहिती घेण्यासह प्रतिबंधित क्षेत्रातील हाय रिस्क, लो रिस्कमध्ये असणाऱ्यांसह संशयितांचे स्वॅब घेतले जातील. यात खाजगी डॉक्टरांचीही मदत घेणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
लॅबची क्षमता ५०० अहवालांपर्यंत नेणार
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॅबमधून १७० अहवाल दररोज येत आहेत. ही क्षमता शनिवारपर्यंत ५०० पर्यंत वाढविणार असून यासाठी वाढीव उपकरणांचा वापर केला जाऊन जास्तीत जास्त अहवाल व तेदेखील वेळेत येण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यात २४ तासात अहवाल आला पाहिजे असे उद्दीष्ट असून काही कारणास्तव उशिर झाल्यास तो अहवाल ४८ तासात आलाच पाहिजे, यावर भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.