‘कोरोना’ची झडप, २० दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:15 AM2020-10-04T00:15:34+5:302020-10-04T00:25:38+5:30

कोरोना महामारीत २० दिवसातच एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील साकरे गावात घडली.

Corona crash kills four in 20 days | ‘कोरोना’ची झडप, २० दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

‘कोरोना’ची झडप, २० दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देबापही नियतीपुढे झुकलाभावापाठोपाठ दोन्ही लेकरांचा मृत्यूनुसत्या विचारातूनच मन सुन्न

धरणगाव, जि.जळगाव : कोरोना महामारीत २० दिवसातच एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील साकरे गावात घडली. अमृतकर कुटुंबातील तिघा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लेकराच्या मृत्यूचा घाव सहन न झाल्याने ८५ वर्षीय वृद्ध पित्याला हृदयविकाराने हेरले आणि तिथेच क्रूर काळाने मृत्यूची चौकट साधली.
साकरे येथे राहणारे पण सध्या धरणगावच्या चिंतामणी मोरया परिसरात राहणाऱ्या अमृतकर परिवारातील जबाबदार माणसे अकाली मरण पावल्याने परिवाराची घडी विस्कटली आहे. साकरे येथील शेती आणि खत विक्रेते आपला उदरनिर्वाह करणारे अमृतकर कुटुंब मेहनती आणि सालस कुटुंब म्हणून ओळखले जाते. कुटुंबातील सर्वात आधी शांताराम गोपाल अमृतकर (७५) यांचे कोरोना सदृश आजाराने निधन झाले. त्यानंतर सुनील पुंडलिक अमृतकर (५२) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जळगावी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ३० सप्टेंबर रोजी, तर सतीश पुंडलिक अमृतकर (५०) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १ आॅक्टोबर रोजी निधन झाले, तर २ आॅक्टोबर रोजी आधी भावाचा आणि नंतर दोन्ही मुलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने घरचे वयोवृद्ध पुंडलिक गोपाल अमृतकर (८५) यांचीही हृदयविकाराने प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ एक अमृतकार परिवारावर काळाने असा घाला घातला की सारा गावच सुन्न झाला. कोरोनाच्या महामारीत अमृतकर कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. एकत्र कुटुंब असल्याने तेरा सदस्य आनंदात राहत होते. परंतु आनंदी कुटुंबावर नियतीने घाला घातल्याने कुटुंबातील कर्ते पुरुष गेले आणि कुटुंबाचा आधार राहिलेला नाही. शिवाय शेती, व्यवसायासाठी बँका, वि. का. सोसायटी, उसनवार असे कर्जदेखील आहे. अशावेळी घरातील महिला, लहान मुले हा भार कसा पेलतील हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे.
नुसत्या विचारातूनच मन सुन्न
कोरोनाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. एकाच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही; तोपर्यंत दुसरी दु:खद घटना घडत आहे. गेल्या महिनाभरापासून या कुटुंबाची काय अवस्था असेल याचा नुसता विचार केला तरी मन सुन्न होत आहे. एकामागे एक घटना घडत राहिल्याने कोरोनाची प्रचंड भीती कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये तसेच गावातही निर्माण झाली आहे.

Web Title: Corona crash kills four in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.