जळगावात कोरोना २० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:01+5:302021-03-20T04:16:01+5:30
जळगाव : शुक्रवारी शहरात कोरोनाचे नवे २७० रुग्ण आढळून आले असून, दोन बधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून ...
जळगाव : शुक्रवारी शहरात कोरोनाचे नवे २७० रुग्ण आढळून आले असून, दोन बधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दोनशेपेक्षा अधिकच नोंदली गेल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या वीस हजारांच्या पुढे गेली आहे. शिवाय, सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे.
रुग्णसंख्या अधिक असल्याने शहरात विविध यंत्रणांमध्ये बेडची समस्या निर्माण झाली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये ७ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे. जळगाव शहरातील ५० व ६० वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ५० वर्षीय व ६२ वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील ६२ व ६५ वर्षीय पुरुष तर धरणगाव तालुक्यातील एका चाळीस वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून मृतांची संख्या सातत्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक नोंदली जात येत आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. कमी वयाचे मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील १८९ रुग्णांना कोरोनातून मुक्त झाल्यानंतर शुक्रवारी घरी सोडण्यात आले.
अधिकारी विलगीकरणात
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून, डॉ. चव्हाण यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पुढील ७ दिवस ते विलगीकरणात राहणार आहेत.
जीएमसीतील ते कक्ष अखेर सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सी-१ या नेत्र कक्षातील कोविड पॉझिटिव्ह १६ रुग्णांना सात व आठ नंबरच्या कक्षात शुक्रवारी सायंकाळी हलवण्यात आले आहे. सी-१ कक्षात आपत्कालीन विभाग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर तातडीने या हालचाली करण्यात आल्या. यास जिल्हा रुग्णालयातील ५० टक्के स्टाफ तसेच नर्सिंगच्या ४० विद्यार्थिनी प्रशिक्षणार्थी म्हणून कोविडसाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे मनुष्यबळाचा मुद्दा निकाली निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.