कोरोनाने हिरावले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:57+5:302021-06-11T04:11:57+5:30
२०० महिलांचा शोध : शासनाच्या विविध योजनांद्वारे महिलांना मिळणार आधार स्टार ८०१ जळगाव : कोरोनाच्या संसर्गाने अनेक कुटुंब ...
२०० महिलांचा शोध : शासनाच्या विविध योजनांद्वारे महिलांना मिळणार आधार
स्टार ८०१
जळगाव : कोरोनाच्या संसर्गाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. यामध्ये अनेक घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेकडो महिलांचा आधार हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूपैकी किती महिलांचे कुंकू कोरोनाने हिरावले गेले आहे, याचा शोध घेणे सुरू आहे. आतापर्यंत अशा २०० महिलांची संख्या समोर आली आहे. हा शोध अजूनही सुरूच असून या आधार गेलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला आणि त्याचा सर्व क्षेत्रावर परिणाम होण्याससह कुटुंबेदेखील उद्ध्वस्त झाली. अनेक कुटुंबांमध्ये कोणाचे आई-वडील गेले, कोणाचे मुलं गेले तर काही कुटुंबात घरातील अनेक सदस्य हिरावले गेले. यात अनेक महिलांचे कुंकुदेखील या कोरोनाने हिरावले आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने अशा महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
या महिलांना आधार मिळावा म्हणून शासनाच्यावतीने देखील काही सूचना देण्यात आल्या आहे. तसेच जिल्हा पातळीवरदेखील प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये ज्या महिला निराधार झाल्या आहे, अशा महिलांचा शोध घेतला जात असून त्यांना आधार देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. यात आता प्रत्येक पंधरा दिवसातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. शहर, गाव, तालुका अशा सर्वच पातळीवर या महिलांचा यंत्रणेमार्फत शोध घेऊन त्यांची नोंद केली जात आहे. त्यांचा शोध घेतला तर जात आहे, मात्र या सोबतच संबंधित महिलांनी महिला व बाल विकास विभाग अथवा अंगणवाडीसेविका यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती देण्याचे आवाहनदेखील केले जात आहे.
कोरोनाने २०० महिलांना केले निराधार
मार्च २०२०मध्ये कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी हा आजार नवीनच असल्याने यंत्रणा याविषयीच्या उपचार व उपाययोजना विषयी अनभिन्न असण्यासह सर्वच नागरिक धास्तावलेले होते. ज्याठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळला, त्या ठिकाणी नागरिकांच्या मनात अधिकच भीती निर्माण होऊ लागली. त्यात कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे आता आपण संपलो अशी जास्ती अनेकांनी घेतली व मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले. यामध्ये अनेक घरातील कर्त्या पुरुषांचादेखील मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेमध्ये देखील संसर्ग झपाट्याने वाढल्याने मृत्यूचे प्रमाण देखील वाढले. यात गेल्या वर्षापेक्षा मनात भीती कमी असली तरी विषाणूची बाधा अधिक गंभीरतेने होऊ लागल्याने यंदादेखील मृत्यू वाढले.
या दोन्ही लाटांचा विचार केला तर २०० महिला यामुळे निराधार झाल्या आहे. ही आकडेवारी आतापर्यंत समोर आली असून अजून शोध सुरू असल्याने ती वाढू शकते.
असा मिळू शकतो लाभ
कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब निवृत्तीवेतन योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यासह जिल्हा स्तरावर असलेल्या योजनांचादेखील महिलांना लाभ देण्याचे नियोजन सुरू आहे. यासोबतच महिला आर्थिक महामंडळ, बचत गट यांचे सदस्यत्व देऊन त्यांना अर्थसाह्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासोबतच कौशल्य विकास कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. याचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधून अथवा अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे आपले नाव व संपर्क क्रमांक द्यावा, त्यानंतर संबंधित महिलांच्या घरी जाऊन कागदपत्र व इतर माहितीची खात्री केली जाणार आहे. या लाभ देण्यात येणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक निकषदेखील पाहिले जाणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण १४१२०९
बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३६१९०
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण २४६१
एकूण मृत्यू २५५८
महिलांचे मृत्यू ९०६
कोरोनामुळे ज्या महिलांचा आधार हिरावला गेला आहे, अशा महिलांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत अशा २०० महिला समोर आल्या आहे. या महिलांना शासनाच्या विविध योजनांसह जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांचादेखील लाभ देऊन आधार दिला जाणार आहे. यामध्ये संबंधित कुटुंबाचे आर्थिक निकषदेखील पाहिले जातील.
- विजयसिंह परदेशी, महिला व बाल विकास अधिकारी