कोरोनामुळे मूर्तीकारांच्याच व्यवसायात विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:47 AM2020-06-05T11:47:38+5:302020-06-05T11:47:53+5:30
आर्थिक कोंडी : सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची आॅर्डरच नाही, केवळ घरगुती गणेशमूर्तींवर भर
जळगाव : ज्या गणेशोत्सवाच्या आनंदात भक्तगण तल्लीन होऊन जातो, त्या विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांच्याच व्यवसायात यंदा विघ्न आले आहे. कारण पैसे खर्चूनही कच्चा माल मिळत नाही, परप्रांतिय कामगार तर केव्हाच घरी गेलेत. त्यामुळे स्थानिक कामगारांना घेऊनच कामे उरकावी लागत आहेत. त्यातच गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची एकही आॅर्डर न आल्याने यंदा घरगुती गणेशमूर्तींवरच व्यवसाय चालवण्याची वेळ मूर्तीकारांवर आली आहे.
जळगाव शहरात जवळपास गणेशमूर्ती बनवण्याचे २० मोठे कारखाने आहेत तर ५० ते ६० छोटे कारखाने आहेत. मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीतच सुरु होते. सुरुवातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात आणि होळी झाल्यानंतर गणेश मंंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले अन् कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडाउन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले दोन महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरु झाले. मात्र गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरु होणार, तेवढ्यातच लॉकडाउन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नसल्याने आणि यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तीकार चिंतेत पडले आहेत.
संभ्रमामुळे आवडीला ब्रेक; उत्साहालाही लगाम
गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा उत्सव असतो. त्यामुळे त्याचा उत्साह हा दरवर्षी आणखीन व्दिगुणित होतो. मात्र यंदा कोरोनामुळे अजूनपर्यंत शासनाने गणेशोत्सवाबद्दल कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने मूर्ती सांगायच्या की नाही, इथपासून ते अगदी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा हाणार की नाही, असे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे मंडळांनीही यंदा अजूनही गणेशमूर्तीची आॅर्डर दिलेली नाही.
दरवर्षी आमच्या कारखान्यात २५०० ते ३ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र यंदा केवळ दीड हजार गणेशमूर्ती बनवण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही अन् आॅर्डरही नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीकार आर्थिक संकटात सापडला आहे. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. तरीही आम्ही काही मोठ्या मूर्ती बनवण्याचे नियोजन करत आहोत. आमच्या मूर्तीशाळेत दरवर्षी ३०० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र एकही आॅर्डर नाही.
-राजू वसंत पाटील, मूर्तीकार, शिवाजीनगर, जळगाव
काही व्यवसाय तर पूर्णच बुडाले
मोठे मूर्तीकार हे जानेवारीपासून मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र छोटे मूर्तीकार हे वीटभट्टीचे काम संपले की हे काम सुरू करतात. मात्र त्यांचे मूर्ती घडवण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाउन सुरू झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
परप्रांतीय कामगार परतले
गणेशमूर्तींचे काम सुरू झाल्यानंतर लॉकडाउन सुरू झाले, त्यामुळे या व्यवसायात असलेले परप्रांतीय कामगार आपापल्या घरी परतले आहेत. जळगावात मध्यप्रदेशातील रानपूर, खंडवा येथून तसेच राज्यस्थानचे कारागीर येतात. हे कारागीर कच्चा माल तयार करून देण्याचे काम करतात. मात्र यंदा हे काम स्थानिकांना करावे लागणार आहेत. यातील राज्यस्थानच्या कारागिरांचे जळगावात स्वत:चे कारखानेही आहेत तर काहीजण दुसºया मूर्तीकारांकडे काम करतात.
मूर्ती महागणार
यंदा कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती तसेच लॉकडाउनमुळे वाहतुकीसाठी वाढलेला खर्च यामुळे मूर्ती २० ते २५ रुपयांनी महागणार आहेत. घरगुती गणेशमूर्ती या दरवर्षी १२५ रुपयांपासून ते अगदी ९०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध असतात.
कच्चा कालही मिळेना
गणेशमूर्तीसाठी पीयुपी हे राज्यस्थान येथून मागवले जाते तर मोठ्या मूर्तींसाठी लागणारा काथ्या हा तामिळनाडू व राज्यस्थान येथून मागवला जातो. यंदा पैसे देऊनही हा कच्चा माल मिळत नसल्याने मोठ्या मूर्तींची आॅर्डर आली तरी ती पूर्ण कशी करणार? असा प्रश्न मूर्तीकारांसमोर आहे.