कोरोना : त्रस्तता नको; संयम हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:17 PM2020-03-15T12:17:45+5:302020-03-15T12:18:27+5:30
बंदी आणि सक्तीच्या आदेशांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर हवा, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमधील त्रुटी उघड, मंदीच्या वातावरणातून सावरण्यासाठी सरकारी साथ हवी
मिलिंद कुलकर्णी
चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव आणि परिणाम संपूर्ण जगभर जाणवू लागताच जागतिक आरोग्य संघटनेने साथ म्हणून त्याची घोषणा केली. अमेरिकेने राष्टÑीय आणीबाणी जाहीर केली. ज्या वेगाने हा आजार पसरत आहे, ती चिंताजनक अशीच स्थिती आहे. सरकारी पातळीवर उपाययोजना होत आहे. परंतु, या स्थितीत त्रस्त होण्यापेक्षा संयम राखण्याची नितांत आवश्यकता आहे.
कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असताना कोरोनाला महत्त्व का देण्यात येत आहे, त्यामागे काही षडयंत्र तर नाही, अशी शंका समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे. मात्र इतर आजारांवर प्रतिबंधात्मक लस, औषधी उपलब्ध आहेत. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अद्याप कोणत्याही औषधाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच एक पर्याय सरकार आणि जनतेच्या हाती राहिला आहे. पुढे जाऊन औषधी, लस सापडेल तेव्हा भीती कमी होऊ शकते.
या आजाराची व्याप्ती आणि परिणामकारकता लक्षात येत नसल्याने सरकारी पातळीवर वेगवेगळे प्रतिबंध लावण्यात येत आहे. समूहपातळीवर लागण होत असल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बाजारपेठा अशा ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे.
शहर व ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील त्रुटी यानिमित्ताने उघड होत आहे. अशा साथरोगाच्या काळात परिपूर्णतेने आम्ही लढू शकत नसू, तर मग सामान्यांचे रक्षण आणि मनोधैर्य वाढविणार कोण? सॅनिटायझर व मास्क वापरा असे आवाहन केले जात असताना त्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे किंवा नाही, हे बघायला हवे की नको. या दोन्ही वस्तू बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत. काळाबाजार तरी होत असावा किंवा उत्पादन कमी असावे. यातून सामान्य माणसांमध्ये त्रस्तता वाढते.
कोरोनापासून बचावासाठी छोटे-छोटे उपाय आहेत, ते अवलंबले तरी आम्ही त्याला अटकाव करु शकतो. पण आम्ही नागरिक म्हणून त्याचा अवलंब करण्यापेक्षा आमच्या सवयींवर टिकून राहतो. किती गाव आणि शहरे निर्मल आहेत? भूमिगत गटारींची स्थिती कशी आहे? रस्ते आणि परिसराची स्वच्छता राखली जाते काय? कचºयाची विल्हेवाट लावली जाते काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक अशीच आहे. त्यामुळे आशिया खंडात भारताला सगळ्यात जास्त फटका कोरोनाचा बसला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तहान लागली की, विहिर खणण्याची आमची मानसिकता आहे. त्याची प्रचिती या काळात पुन्हा एकदा आली. कोरोनामुळे किमान यंत्रणेत सतर्कता आली तरी खूप झाले असे म्हणावे लागेल.
कोरोनाने संपूर्ण जगाला भयकंपीत केले आहे. चीनपाठोपाठ युरोप, अमेरिका आणि भारतात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी पातळीवर बंदी आणि सक्तीचा सरधोपट मार्ग अवलंबला जात आहे.
एकीकडे मास्क आणि सॅनिटायझर वापरा
असे आवाहन करायचे आणि या वस्तूच बाजारपेठेतून गायब होत आहेत, त्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट होऊनही उपलब्ध होत नाही, यावरुन आपत्कालीन काळाशी मुकाबला करण्यासाठी असलेली आमची मर्यादा उघड होते. प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनजागृती खूप महत्वाची असली तरी त्यात त्रस्तता नको. भावनिक आधार महत्त्वाचा आहे.