कोरोना इफेक्ट! सुवर्णनगरीला ७०० कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:33 AM2021-04-18T05:33:18+5:302021-04-18T05:33:27+5:30
लग्नसराई व मुहूर्तांच्या खरेदीवेळी दुकाने बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमुळे सुवर्णपेढ्याही बंद असल्याने या बंदकाळात जवळपास ७०० कोटींचा फटका एकट्या जळगाव शहरातील सुवर्ण व्यवसायाला बसला आहे.
लग्नसराई व गुढीपाडव्यासारखा मुहूर्तदेखील हुकल्याने सुवर्ण व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. जळगावातील सोने प्रसिद्ध असल्याने येथे बाराही महिने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात लग्नसराईमध्ये तर सुवर्णपेढ्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसते, मात्र सलग दुसऱ्या वर्षी ऐन लग्नसराई व
मुहूर्ताच्या खरेदीवर ही दुकाने बंद आहेत. ब्रेक द चेनमुळे सुवर्णपेढ्या बंद आहेत. नियमित गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्यांसह लग्नसराईची खरेदी यामुळे नेमका हा मोठ्या उलढालीचा हंगामच सुवर्ण व्यावसायिकांच्या हातचा गेला आहे. स्वत:सह ग्राहक व सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने नियम पाळण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
ब्रेक द चेनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने या काळात जळगावातील किमान ७०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ‘ब्रेक द चेन’नंतरही कसे चित्र राहील, हे सांगणे कठीण आहे.
- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव