ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 12:51 PM2020-05-10T12:51:14+5:302020-05-10T12:54:09+5:30

प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेकडून गांभीर्य हरपले, शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावाने पडली भर, मदतीच्या नावाखाली राजकीय मंडळींची केवळ चमकोगिरी

Corona explosion due to sloppy planning | ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा विस्फोट

ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा विस्फोट

Next

मिलिंद कुलकर्णी
खान्देशातील नंदुरबार हे आॅरेंज झोनमध्ये तर जळगाव आणि धुळे रेड झोनमध्ये असताना लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वातील ढिसाळ नियोजनामुळे आठवडाभरात कोरोनाचा विस्फोट झाला. नंदुरबारात २१ रुग्ण, त्याच्या अडीचपट धुळ्यात ५४ रुग्ण तर कितीतरी पटीने जळगावात म्हणजे १७२ च्या आसपास रुग्ण आहेत.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता अशा तिन्ही घटकांच्या बेपर्वाईने कोरोनाचा विस्फोट झाला. जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात चांगले काम केल्यानंतर तिसºया टप्प्यात कामगिरी घसरली. गोंधळ निर्माण करणारी परिपत्रके, शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव, कर्मचाऱ्यांवर नसलेले नियंत्रण, टाळेबंदीची अंमलबजावणी करताना जनता, लोकप्रतिनिधी यांच्याशी उडालेले खटके याच गोष्टी अधिक गाजल्या. कठोर भूमिका घेऊन प्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी हरकत नसते. पण वेळ निघून गेल्यावर सक्तीचे लॉकडाऊन केल्यावर हाती काय उरणार हा प्रश्न आहेच.
जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर अधिक असल्याबद्दल माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली. संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून त्यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. अधिष्ठात्यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकाºयांची समिती नेमून चौकशी केली. पण प्रशासनाची बाजू घेणाराच अहवाल आला. मालेगावला बंदोबस्ताला गेलेले ५ कर्मचारी पळून आले. तर काहींना कोरोनाची लागण झाली. रणछोड कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई झाली.
लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाशी समन्वय व जनतेला धीर देणे, समजावून सांगण्याची अपेक्षा होती. परंतु, वेगळेच चित्र समोर आले. काही लोकप्रतिनिधी घरीच थांबले तर काही कार्यकर्त्यांना घेऊन दौरे, फोटोसेशन करताना आढळले. सलग दीड महिन्यापासून अखंडपणे काम करणाºया प्रशासनावर तोंडसुख घेण्याची मर्दुमकीदेखील काहींनी बजावली. तर काहींच्या कुटुंबीयांवर मद्याची हेराफेरी केल्याचे गुन्हे दाखल झाले. दीड महिना लोटल्यानंतर काहींना कोरोनाची आठवण आली आणि मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट वाटपाचे तालुकास्तरीय कार्यक्रम आणि जोडून शासकीय अधिकाºयांच्या आढावा बैठकांचा धडाका लावण्यात आला.
दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर हातघाईवर आलेल्या व्यापाºयांनी कहर केला. सिंधी कॉलनीत लॉकडाऊनला न जुमानता दुकाने उघडी होती. बळीराम पेठेत मनपाचे पथक येताच दुकानदाराने ग्राहकांना चक्क कोंडून ठेवले. शासकीय आदेशांचा सोयीचा अर्थ काढून दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाला. पारोळ्यात नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांमध्ये व्यापाºयांच्या प्रश्नावरुन जुंपली.
आणि जनतेचे काय विचारता? कोरोना योध्दयांसाठी टाळ्या वाजविणारे, दिवे उजळविणाºया याच जनतेने परीक्षा संपल्याच्या विद्यार्थ्याच्या आनंदासारखा आनंद थोडी सवलत मिळताच दाखविला. दारु दुकानांसमोर लागलेल्या रांगा पाहून तर ‘स्कायलॅब’ कोसळण्याच्या संकटात मिठाईच्या दुकानासमोर लागलेल्या रांगा आठवल्या. मनोवृत्ती तीच.
लॉकडाऊनच्या दोन पर्वामध्ये सर्वच यंत्रणांमध्ये संवाद, समन्वय, शिस्त यांचा अंतर्भाव असल्याने जागतिक संकट असलेल्या कोरोनाला खान्देशात थोपविण्यात यश आले. परंतु, तिसºया पर्वात ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याची
अंमलबजावणी करताना कठोरता आवश्यक आहे. वेळ निघून गेली की, हाती काही राहत नाही. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकांमुळे गोंधळात भर पडली. त्यात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला. लोकप्रतिनिधींचा अवास्तव हस्तक्षेप डोकेदुखी ठरला.

Web Title: Corona explosion due to sloppy planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.