भुसावळ जंक्शनवर ‘कोरोना एक्स्प्रेस’ सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:15 PM2020-05-15T17:15:12+5:302020-05-15T17:16:38+5:30
महामारीच्या एक्सप्रेसला जनसामान्यानी एकत्र येऊन लढा देऊन रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : जंक्शन शहरात कोरोना एक्स्प्रेस सुसाट असून प्रत्येक परिसराला ग्रीन सिग्नल मिळत असल्याने थांबा घेत आहे. महामारीच्या एक्सप्रेसला जनसामान्यानी एकत्र येऊन लढा देऊन रोखणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांचा बेफिकीरपणा, प्रशासनाची हतबलता याचे प्रमुख कारण आहे.
राजकीय मंडळी ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये प्रत्येक घरोघरी घरोघर पिंजून काढत आपला प्रचार प्रसार करतात त्याच पद्धतीने कोरोनाला थोपविण्यासाठी निर्णायक व ठोस पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे.
निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या आदल्या रात्री व मतदानाच्या दिवशी पायाला भिंगरी लावून ज्या पद्धतीने कार्यकर्ते फील्डिंग लावतात त्याच पद्धतीने आताही आपले विश्वासू कार्यकर्ते नेमून भुसावळ शहर आपला व व आम्ही शहराचे अशी भूमिका सर्व पक्षीय नेतेमंडळी गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच या सुसाट धावणाऱ्या एक्सप्रेसला लगाम लागू शकते.
कोरोना एक्सप्रेसने भुसावळच्या जवळपास सर्व परिसरांमध्ये थांबा घेत असून ७० ते ८० टक्के परिसर व्यापून घेतला आहे. महामारीच्या एक्सप्रेसला आता एंंट्री नकोच असा सूर सर्वसामान्यांतून उमटत आहे.
भुसावळकरांनी आजाराला गांभिर्याने घ्यावे. किरकोळ कारणासाठी घराबाहेर पडू नये. कोरोनावर अजून औषध नाही. प्रादुर्भाव रोखणे हेच त्यावर उपाय आहे. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. जीवनापेक्षा मौल्यवान काहीच नाही. काही दिवस घरीच थांबल्यास कोरोनावर नक्कीच मात करता येणे शक्य आहे. प्रशासन एकटे काहीच करू शकत नाही. प्रशासनास सहकार्य करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बाहेर निघून आपल्या कुटुंबाची स्वत: दुष्मन बनू नका.
-संजय सावकारे, आमदार, भुसावळ
नागरिकांच्या बेफिकीरीने शहरात कोरोना पाय पसरवत आहे. नागरिकांनी जागृत राहून संशयित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला कळवावी. शहरांमध्ये उशिराने रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. व्यापक जागृती व्हावी. सोशल डिस्टन्स, लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. कंटेनमेंट झोन कोणीही गांभिर्याने घेत नाही ही चिंतेची बाब आहे.
-फिरोज रहेमान शेख, जिल्हाध्यक्ष, एआयएमआयएम, जळगाव
मीच माझा रक्षक असं ठरवलं तर संसर्गजन्य माणुसकीचा दुश्मन कोरोना या आजारावर नक्कीच मात करता येईल. सर्वांनी जागृत राहावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, कोरोनावर आजी-माजी आमदारांनी राजकारण करू नये. सक्तीने लॉकडाऊन पाळावे. सर्वांनी एकदिलाने लढा दिल्यास नक्कीच आपण कोरोना हद्दपार करू शकतो.
-जगन सोनवणे, प्रदेश महामंत्री, पीआरपी, जळगाव.
स्वत:ची काळजी स्वत: घ्या. लॉकडाऊन शिस्तीने पाळा. जुन्या काळात एका डाळीचे चार-पाच प्रकार करून भाजी तयार करायचे. आता भाजीपाल्याच्या नावाने अनावश्यक बाहेर पडू नका. जुन्या लोकांचा फार्म्युला वापरा. प्रशासनाला आरोग्य, पालिका, पोलीस विभागाला सहकार्य करा. शिवसेना नेहमीच मदतीसाठी तत्पर आहे.
-समाधान महाजन, तालुका प्रमुख शिवसेना, भुसावळ
प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात जनतेने कडकडीत बंद पाळाववा. मात्र त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाने गोरगरीबांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे. पोटाची भूक शमविण्यासाठी नागरिकांना इच्छा नसताना बाहेर पडावे लागते. शासनाच्या नियमांचा तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे याचाही काटेकोरपणे अवलंब करावा.
-संतोष चौधरी, माजी आमदार, भुसावळ
आरोग्य विभागाने कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची औपचारिकता म्हणून आरोग्य तपासणी न करता गांभीर्याने आरोग्य तपासणी करावी. प्रत्येक भागामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात यावे. संपूर्ण शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे रिक्षा लावून जनजागृती सातत्याने करावी. तसेच समाजबांधवांनी कोरोना आजाराला गांभीर्याने घ्यावे. बेफिकीर व गाफील राहू नये. शासनाच्या नियमाचे पालन करावे.
-मुनव्वर खान, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष, भुसावळ