गर्दीमुळे कोरोनाची पुन्हा भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:42+5:302021-06-09T04:21:42+5:30
भुसावळ : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्य शासनाने सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शासनाने नियमात ...
भुसावळ : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्य शासनाने सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शासनाने नियमात शिथिलता देताच नागरिक बाजारात मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. यामुळे पुन्हा कोरोना वाढणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, अनलॉकनंतर आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज आहे.
सामाजिक अंतराचे पालन व्हावे
प्रशासनाने नियमात शिथिलता देताच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून सामाजिक अंतराचे पालन व मास्क वापर होताना दिसून येत नाही. खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. एकाच माणसाची खरेदीसाठी आवश्यकता असतानादेखील परिवारातील अनेक सदस्य विनाकारण बाजारपेेठेत गर्दी करतानाचे चिंताजनकही चित्र आले.
तिसऱ्या लाटेचा धोका
जिल्ह्यासह तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या दररोज कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. नगरपालिका, पोलीस प्रशासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू होताच कारवाई बंद केली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कारभारासाठी पथके तैनात करण्याची गरज आहे.
वाहनावर विनामास्क, ट्रिपल सीट बिनधास्त
कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान पोलीस प्रशासनाकडून मुख्य चौकात बॅरिकेडस् लावून कसून चौकशी करण्यात येत होती. मात्र, शिथिलता मिळताच अनेक जण कोरोनाचे तर सोडा, वाहतुकीचे नियमसुद्धा विसरले असून, ट्रिपल सीट विनामास्क फिरताना नागरिक दिसून येत आहेत, तसेच पानटपऱ्यासह चहाच्या दुकानावरही गर्दी होताना दिसून येत आहे.
शासनाने कोरोनास्थिती आटोक्यात येत असताना शिथिलता जरी दिली असली तरी, प्रत्येकाने कोरोना नियमाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमाचे उल्लंघन होत असेल तर अशांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. वस्तुस्थितीचा आढावा घेऊन येत्या काही दिवसांत वेळप्रसंगी कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल.
-रामसिंग सुलाने, प्रांताधिकारी, भुसावळ
---------------------------------------------
वाहतूक शाखेचे कर्मचारी गेल्या महिनाभरापासून ठिकठिकाणी बंदोबस्ताला होते. उद्यापासून पूर्वीप्रमाणेच मुख्य चौकामध्ये नाकाबंदीसह वाहनांची तपासणी करण्यात येईल. दुकानांमध्ये गर्दी आढळून आल्यास नक्कीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कोरोना नियमाचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. उल्लंघन होताना दिसल्यास वेळप्रसंगी गुन्हेही दाखल करावे लागतील.
-सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी, भुसावळ