कोरोनाने दिला सर्वांना बचतीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:58+5:302020-12-14T04:30:58+5:30

कोरोनाने भल्याभल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. काहींना ...

Corona gave everyone a lesson in saving | कोरोनाने दिला सर्वांना बचतीचा धडा

कोरोनाने दिला सर्वांना बचतीचा धडा

Next

कोरोनाने भल्याभल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. काहींना अक्षरशः लोकांकडे हात पसरवावे लागले. ज्यांनी हे अनुभवले त्यांना बचतीचे महत्व कधी नव्हे इतके प्रकर्षाने परिस्थितीने शिकवले.

पण आताच्या तरुण पिढीपैकी काही लोक यापरिस्थितीत सुद्धा जाणीवपूर्वक वागतांना दिसत नाहीत, तेव्हा वाईट वाटते. दिखावू गोष्टींवरच अधिक खर्च होतांना दिसतो. त्याची खरेच गरज आहे का? याचा विचार करायलाच हवा. समाजात आपल्या अवतीभवती अनेक आदर्श लोक असतात. ते काय करतात, कसे राहतात, हे फक्त पाहून सुद्धा ब-याच गोष्टी शिकता येतात. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आणि जाणीव जागी ठेवली पाहिजे. कारण के तर, कोरोनाचे संकट जसे आता ओढवले, तसे कोणते संकट कधी येईल सांगता येत नाही.

कपडे, मोबाईल आणि वाहन यावर बराच खर्च होतो असे दिसते. साधी राहणी हवी हे आपण स्वतःच्या उदाहरणातून सांगणे केव्हाही अधिक परिणाम कारक असते. मी गांधीजींना पहिले नाही, फक्त वाचले आहे. पण बाबा आमटेंना, प्रकाश आमटे, विकास आमटे, प्रा. राम शेवाळकर, मारुती चितमपल्ली यांना मी अनेकदा भेटलो आहे. मुलांनाही त्यांना भेटायला घेऊन गेलो. बोललो काहीच नाही. पण लहानपणापासून अशाच लोकांना भेटायला म्हणून मुद्दाम घेऊन जात असे. याचा व्हायचा तो परिणाम होतोच. तेव्हा मुलांना दोष देण्याऐवजी त्यांची दृष्टी बदलेल, स्वत:ची राहणी बोलेल, हे पाहणे हे पालकांचेही कर्त्यव्य आहे.

कष्टांना पर्याय कुठेच नाही. तेव्हा कमावलेले पैसे विचारपूर्वक गुंतवावे. त्यापासून कमाई सुरु राहील. अशा बचतीतून केलेल्या गुंतवणुकीतून आलेले उत्पन्न स्वत:साठी जरूर खर्च करा. मुलांसाठी फार बचत करून ठेवू नका. त्यांना उद्योगधंदे उभे करून काम करण्याची सवय लावा. नोक-या सगळ्यांना मिळतीलच असे नाही. अनेकदा खूप शिक्षण घेऊनही बरेच लोक आता परदेशातून स्वदेशात तर शहरांकडून लहान गावात परतू लागले आहेत. शहरी चमकदमक दिखावू व आपल्या कामाची नसते याची जाणीव जागी होऊ लागली आहे. त्याकडे विचारपूर्वक पहिले पाहिजे.

कोरोनाच्या काळात ज्यांनी बचतीचे महत्व जाणले आणि अंमलात आणले ते सुज्ञ ठरले. यावरून आपण सगळ्यांनीच धडा घेणे गरजेचे आहे.

सीए अनिलकुमार शाह

Web Title: Corona gave everyone a lesson in saving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.