१२ लाख ३० हजार नागरिकांना होऊन गेलाय कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:24+5:302021-02-07T04:15:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : डिसेंबर महिन्यात झालेल्या सिरो सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ४२७ जणांचे रक्तनमुने संकलीत करण्यात आले होते. त्यापैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डिसेंबर महिन्यात झालेल्या सिरो सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ४२७ जणांचे रक्तनमुने संकलीत करण्यात आले होते. त्यापैकी १२१ जण बाधित आढळून आले आहेत. २८.३४ टक्के बाधितांचे प्रमाण समोर आले आहे. यानुसार जिल्ह्यातील साधारण १२ लाख ३० हजारांच्या आसपास नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यांना कोरोना होऊन गेलाय, असा या सर्व्हेक्षणातून अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या सर्व्हेक्षणापेक्षा पाॅझिटिव्हीटीमध्ये तीन टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दहा ठिकाणी हा सर्व्हे घेण्यात आला. दोन महिन्यांनी त्याचा अहवाल समोर आला आहे. जिल्ह्यात त्या आधीच कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. शिवाय दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे. आधीच्या दोन सर्व्हे मध्ये अनुक्रमे २ टक्के आणि २५.९ टक्के पॉझिटिव्हिटी आढळून आली होती.
भुसावळात सर्वाधिक ३९ टक्के प्रमाण
जिल्ह्यातील दहा ठिकाणांमध्ये भुसावळमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात सर्वाधिक ३९.०२ टक्के पॉझिटिव्हिटी आढळून आली आहे. वॉर्ड ४५ मध्ये हा सर्व्हे झाला होता. याचा अर्थ भुसावळातील ३९ टक्के जनतेमध्ये ॲन्टीबॉडीज तयार झालेल्या आहेत. म्हणजेच ३९ टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे मात्र, त्यांना समजले देखील नाही, असा हा अंदाज काढता येऊ शकतो.
असा आहे सर्व्हे
मोहराळे - १० पॉझिटिव्ह, २४.३९ टक्के
तांदलवाडी - १४ पॉझिटिव्ह, ३२.६६ टक्के
कडगाव - १६ पॉझिटिव्ह, ३४.०४ टक्के
धरणगाव - १३ पॉझिटिव्ह, ३१.७१ टक्के
वरखेड- ०८ पॉझिटिव्ह, १९.५ टक्के
नाईकनगर- १२ पॉझिटिव्ह, २६.९ टक्के
गोराडखेडे- ०६ पॉझिटिव्ह, १३.९५ टक्के
भुसावळ- १६ पॉझिटिव्ह, ३९.०९ टक्के
जळगाव- ११ पॉझिटिव्ह, २७.५० टक्के
चाळीसगाव -१५ पॉझिटिव्ह, ३४.८८ टक्के
का होतो सिरो सर्व्हे?
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कसे आहे?. हे शोधण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात दहा ठिकाणे निवडूण त्या ठिकाणी साधारण ४० ते ५० लोकांचे रक्तनमुने संकलीत केले जातात. ते चेन्नई किंवा पुणे येथे तपासणीला पाठविले जातात. यात किती लोकांच्या रक्तांमध्ये ॲन्टीबॉडी (कोरोनाशी लढणारी तत्वे ) विकसीत झाल्या आहेत, बाधितांचे प्रमाण किती आहे याचा अंदाज येतो. त्यानुसार पुढील उपाययोजनांची दिशा ठरविता येते. गेल्या वर्षभरात तीन सिरो सर्व्हे झालेले आहेत.
बाधितांचे प्रमाण असे
सिरो सर्व्हेची पॉझिटिव्हीटी : २८.३४ टक्के
चाचण्यांमधील प्रत्यक्ष पॉझिटिव्हिटी : १३.२१ टक्के
दैनंदिन पॉझिटिव्हिटी : ७.१४ टक्के
कोट
दैनंदिन पॉझिटिव्हिटी ही आधी १६ ते १७ टक्के होती. मात्र, ती घटून आता ८ ते ९ टक्क्यांवर आली आहे. याचा अर्थ यात ५० टक्के घट झाली आहे. सिरो सर्व्हेक्षणात २८ टक्के पॉझिटिव्हिटी आढळून आली आहे. याचा अर्थ एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज आढळून आल्याचा हा अंदाज आहे. गेल्या सर्व्हेच्या तुलनेत ही वाढ मोठी नाही.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी मनपा