कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:34+5:302021-06-03T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कायम आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. दुसरीकडे आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनलॉकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांसह मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत होते. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. सद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूचे प्रमाणही आटोक्यात आले असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. हे प्रमाण पाहता प्रशासनाकडून काही कडक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, जर पुन्हा मागीलप्रमाणे चुका केल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता अटळ आहे. त्यामुळे शासनाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नियमांचे पालक करणे गरजेचे आहे. तर वृध्दांसह बालकांचीसुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व मास्क लावणे आदी नियम नागरिकांनी गांभीर्याने पाळणे अतिआवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
=====
या चुका करू नका...!
- कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मास्क आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आता तर डबल मास्क वापरण्याच्या सूचना आहेत; मात्र अनेक जण मास्कचा वापर हनुवटीवरच करताना दिसतात.
- मंगल कार्यालये बंद आहेत. मात्र घरगुती स्वरूपात होणाऱ्या लग्नसोहळ्यातील गर्दी तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी बाहेर फिरून वाटलेला कोरोनाचा ‘प्रसाद’.
- निर्बंध शिथिल केल्यानंतर बेफिकीर झालेल्या नागरिकांनी वाहतूक कोंडी होईपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून अनेकांनी कोरोनाला घरी नेला असण्याची शक्यता आहे.
- राजकीय कार्यक्रम, बैठकांमधील गर्दीमुळेही कोरोनाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले.
- पहिल्या लाटेत नागरिकांनी वैयक्तिक व कुटुंबाची काळजी घेतली, लक्षणे दिसताच चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत मात्र वैयक्तिक काळजीचा भर ओसरलेला दिसून आला. त्यामुळेच लक्षणे असूनही घरीच उपचार केल्याने रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल केल्यानेच मृत्युदर वाढलेला दिसला.
- विनाकारण नागरिक फिरताना आढळून आले. पोलीस व आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना चाचणी केल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या काही नागरिकांनासुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
- आठवडी बाजारांना बंदी असताना बाजार भरविले गेले. त्यात नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यामुळे कोरोना घरी नेला.
=========
= पालिकेचे सहा पथके
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन होते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने सहा पथकांची नियुक्ती केली आहे.
- मनपाने गठित केलेल्या या प्रत्येक पथकामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- मास्क न लावणे, गर्दी करणाऱ्यांवर पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांची गर्दी तसेच वेळ संपूनही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानधारकांवर दररोज या पथकांकडून कारवाई केली जात आहे. आठवडी बाजारांना परवानगी नसताना, बाजार भरविणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गर्दी न करण्याचे आवाहनही या पथकांकडून होत आहे.
==========
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी सहा पथके नेमण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पथकाडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्तीने काळजी घ्यावी व कुणाला कोरोनाची लागण होणार नाही याचीही काळजी घ्यावी.
- संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा
==========
एकूण बाधित : १,४०,१४२
एकूण बरे झालेले रुग्ण : १,३२,४४९
एकूण मृत्यू : २,५३५
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण : ५,१५८