कोरोनामुळे दैनंदिन उत्पन्नात तीन ते चार लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:17+5:302021-03-06T04:15:17+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. प्रवासी ...
जळगाव : गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होऊन जळगाव आगाराच्या दैनंदिन उत्पन्नात ३ ते ४ लाखांपर्यंत घट झाली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या वर्षी एस.टीची सेवा सहा महिने ठप्प होती. त्यानंतर गेल्या वर्षी दिवाळीपासून ही सेवा टप्प्या-टप्प्याने पूर्ववत झाली. प्रवाशांचा प्रतिसादही उत्स्फूर्त होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे, याचा प्रवासी संख्येवर पूर्वीप्रमाणे परिणाम झाला आहे. जळगाव आगारातून धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, शिरपूर आदी मार्गावर प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे सकाळच्या सत्रातील प्रवाशांची गर्दी वगळता दुपारच्या सत्रातील अनेक मार्गावरच्या बसेसमध्ये क्षमतेपेक्षाही कमी प्रवासी संख्या मिळत आहेत. परिणामी प्रत्येक फेरीला कमी उत्पन्न येत असून, यामधून डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, आगार प्रशासनातर्फे पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे या मार्गावरच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्याचे नियोजन सुरू आहे.
दररोज तीन ते चार लाखांचे उत्पन्न घटले
महामंडळाचे जळगाव जिल्ह्यात ११ आगार असून, यातील सर्वाधिक उत्पन्न जळगाव आगारातून मिळते. विशेष म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जळगाव आगाराचे दररोजचे उत्पन्न १० ते १२ लाखांच्या घरात आहे. मात्र, आता कोरोनामुळे या आगाराचे दैनंदिन उत्पन्न पुन्हा घटले असून, गेल्या आठवडाभरापासून दररोज ५ ते ७ लाखांच्या घरात उत्पन्न येत आहे. त्यामुळे दररोज तीन ते चार लाखांचा फटका सहन करावा लागत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गेल्या आठवडाभरापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे आगाराचे दररोजचे उत्पन्न तीन ते चार लाखांनी घटले आहे. अनेक जवळच्या व लांब पल्ल्यावर जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे काही मार्गावरच्या फेऱ्या कमी करण्याचे नियोजन सुरू आहे.
मनोज तिवारी, स्थानक प्रमुख, जळगाव आगार