कोरोना रुग्णालयाचे सोशल मीडियावर ‘आॅपरेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:51 PM2020-05-18T12:51:52+5:302020-05-18T12:52:05+5:30
कार्यपद्धतीवर टीका : वैद्यकीय वर्तुळातूनही नाराजी, राजकीय मंडळींच्या थेट वरिष्ठांपर्यंत तक्रारी
जळगाव : बाधित रुग्णांचे वाढते मृत्यू, असुविधा, अहवाल प्रलंबित राहणे, अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसणे यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक तीव्रतेने उफाळून येत असल्याची टीका होऊ लागली असून कोरोना रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला जात आहे. सोशल मीडियावर या विषयी जोरदार चर्चा रंगत असून वैद्यकीय वर्तुळातील मंडळींकडूनही नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच या सर्व प्रकाराचा फटका व समन्वय समितीच्या सभेत आमदारांची नाराजी यामुळे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांची बदली होऊन लवकरच त्यांच्या जागी नवीन अधिष्ठाता रुजू होण्याच्या चर्चाही सोशल मीडियावर जोरात सुरू झालेल्या आहेत़
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा आताही आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे़ रोज किमान एक ते दोन बाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत़ शिवाय जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत़ त्यातच अधिकाऱ्यांमधील वादाचाही मुद्दा आहे़च. जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या सभेत यामुद्यावर वादळी चर्चा झाली होती़ अधिकाºयांमध्ये वाद असतील तर गोदावरी महाविद्यालयाला कोविड रुग्णालय घोषित करा, येथील कोविड रुग्णालय बंद करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून समोर आली होती़ त्यातच अधिष्ठाता डॉ़ खैरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेल्यामुळे डॉ़ मारूती पोटे यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे़
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाचा आढावा घेतला़ यावेळी प्रदेश महिला सचिव रिता बाविस्कर यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व अहवालास होणारा विलंब या बाबी यावेळी मांडल्या.
राज्य सरकारवरही टीका
रुग्णांचे आठ आठ दिवस अहवाल येत नसल्याने त्यांच्यावर डॉक्टरांना उपचार करता येत नाही. त्यांच्यावर उपचार होत नसल्याने प्रतिकार क्षमता अधिकच क्षीण होऊन मग रुग्ण दगावतो, असे बरेच प्रकार कोरोना रुग्णालयात घडले असून शासनाचे कसलेच लक्ष नसणे, अहवाल लवकर येण्यासाठी कसलेच प्रयत्न नसणे या बाबी याला जबाबदार असल्याचाही सूर उमटत आहे. केवळ डॉक्टर यांना जबाबदार धरणे चुकीचे होईल, अशीही चर्चा असून राजकारकण करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या परीने यासाठी ताकद लावावी, असा सल्लाही दिला जात आहे़
शरद पवारांनी घेतली दखल
अहवालांची प्रतीक्षा व कोरोना रुग्णालयाची स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली़ सिव्हिल रुग्णालयात दाखल संशयित रुग्णांचे कोरोना तपासणीचे अहवाल ५ दिवस उशिरा येत आहेत. त्यामुळे रुग्णावर उशिरा उपचार होत असून तो दगावण्याची शक्यता वाढते आहे. जळगावात ५७ संशयित आहे, ४ दगावले आहेत. ग्रामीणमध्ये अमळनेर वगळून स्थिती बरी आहे. तरी सुद्धा जळगावात लवकर तपासणी अहवाल यावेत याच्या सूचना मी देतो, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचे देसले यांनी म्हटले आहे़ एनएचमच्या करारावरील कर्मचाºयांचाहीमुद्दा त्यांनी यावेळी मांडला़
एक दोन दिवसात रूजू होणार?
एका वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते़ दरम्यान, या बैठकीला अधिष्ठाता डॉ़ खैरे उपस्थित असल्याने त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यामुळे ते क्वारंटाईन होते़ दरम्यान, शनिवारी त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे ते येत्या एक-दोन दिवसात रुजू होणार असल्याची माहितीही वैद्यकीय सूत्रांकडून समोर आली आहे़
अधिकाºयांवर टीका
उपचार पद्धतीवर टीका होत आहे. यात अधिष्ठाता हे लवकरच बदलतील व त्यांच्या जागी नवीन अधिष्ठाता येतील, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता़ दरम्यान, आपण वरिष्ठ पातळीवर बोललो असून अधिष्ठांची बदली झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे़
वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनाच बसला धक्का
आठ डॉक्टरांनी काल सिव्हीलमध्ये राऊंड घेतला़ तेथील परिस्थिती पाहून आम्हाला धक्का बसला़ तिथे अनेक ज्येष्ठ डॉक्टर आहेत मात्र, त्यांनी गेल्या दोन महिन्यात एकही रुग्ण बधितलेला नाही, पगार मात्र, पूर्ण़ गेल्या दोन महिन्यापासून केवळ चाळीस ते पन्नास कनिष्ठ डॉक्टर या ठिकाणी काम करीत आहेत़ तेही आता थकलेले आहेत़ असा अनुभव खुद्द एका डॉक्टरांनी सोशल मीडियावर कथन केला आहे़ डॉक्टर काम करीत नाही तर साहित्य वापरते कोण? असा सवाल यावर उपस्थित करण्यात आला आहे़ शिवाय वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न मांडावा अशी मागणी करण्यात आली आहे़