जिल्ह्यात कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर मात्र घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:50+5:302021-03-17T04:16:50+5:30
जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझरची विक्री होत होती. प्रत्येक नागरिक किमान १० ...
जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझरची विक्री होत होती. प्रत्येक नागरिक किमान १० रुपयांपर्यंतची सॅनिटायझरची बाटली जवळ बाळगत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक कमी झाल्याने, नागरिकांनी कोरोना कायमचा गेला, याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी आता सॅनिटायझरचा वापरदेखील बंद केला आहे. मात्र, आता पुन्हा कोरोना वाढला असताना, सॅनिटायझरचा वापर मात्र घटला असल्याची माहिती शहरातील औषध विक्रेता व्यावसायिकांनी दिली.
कोरोनाच्या सुरुवातीला गेल्या वर्षी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत सॅनिटायझरची १०० टक्क्यांपर्यंत मागणी होती. सरासरी १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंतच्या बॉटलची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. मागणी असल्यामुळे काही वेळा १० रुपयांच्या बाटल्यांचा तुटवडाही जाणवायचा. तसेच काही मोठे कुटुंब व व्यावसायिक १ लिटरपर्यंतची मोठी सॅनिटायझरची बाॅटल मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर या बाटल्यांचीही मागणी घटली आहे. दरम्यान, आता कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही, म्हणावी तशी सॅनिटायझरची विक्री होताना दिसून येत नाही. सध्या ३० ते ४० टक्क्यांपर्यंत सॅनिटायझरची विक्री सुरू असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
इन्फो :
-मागील वर्षी सॅनिटायझरची विक्री
९० टक्के
- या वर्षी सॅनिटायझरची विक्री
३० टक्के
मास्क विक्रीत
५० टक्के वाढ
इन्फो :
-७० टक्के विक्री घटली
१) सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे मात्र नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढताना दिसून येत आहे. आजही नागरिकांमध्ये मास्क वा सॅनिटायझरचा वापर नसल्याचे आढळत आहे. संपर्कातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सॅनिटायझरच्या वापराकडेच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सॅनिटायझरची विक्री सध्या ७० टक्के घटली असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.
२) गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने सॅनिटायझरची १०० टक्के विक्री होती. मागणी असल्यामुळे अनेक औषध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर माल मागवून ठेवला आहे. मात्र, काही महिन्यांपासून विक्री घटल्यामुळे भांडवल अडकून पडल्याचे काही औषध व्यावसायिकांनी सांगितले.
३) आता कोरोना वाढल्यानंतर नागरिक मास्क खरेदी करत आहेत. मात्र, जंतुसंसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर कमी करीत आहेत. त्यामुळे सध्या कोरोना वाढल्यानंतरही ३० टक्केच सॅनिटायझरची विक्री वाढली आहे.
४) कोरोना वाढल्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सध्या मास्कच्या विक्रीत वाढ झाली असून, सरासरी ५० टक्क्यांपर्यंत मास्कची विक्री होत असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.