शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:13 PM2020-05-12T12:13:23+5:302020-05-12T12:13:27+5:30
रुग्ण संख्या २७ वर : दोन जणांचा मृत्यू
जळगाव : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्ण संख्या २७ वर पोहचली आहे़ बाधितांमध्ये एक डॉक्टर आणि एका नामांकित डॉक्टरांचे वडील यांचा समावेश असल्याची माहिती आहे़ दरम्यान, शहरातील कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या तीनवर गेली आहे़
सोमवारी आलेल्या पॉझिटीव्ह अहवालांमध्ये यामध्ये मारोतीपेठ येथील ४९ वर्षीय महिला, ओंकारनगर येथील ७९ वर्षीय वृद्ध, प्रतापनगर येथील ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे़ यासह तालुक्यातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथील २३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. यात एक रुग्ण एका नामांकित डॉक्टरांचे वडिल असून या नामांकित डॉक्टरांना या आधी बाधित रुग्णावर उपचार केल्याने क्वारंटाईन करण्यात आले होते़ यासह एक रुग्ण डॉक्टर असून त्या काही दिवसांपूर्वी बाहेर गावाहून आलेल्या होत्या़ त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी करून घेतली होती़ आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला़ यात दरम्यान, रात्री आलेल्या एका अहवालात एका ५० वर्षीय प्रौढांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ सोमवारी झालेल्या मृत्यूमध्ये मेहरूण येथील महिला व निमखेडी रोड येथील प्रौढाचा समावेश आहे़
अभियांत्रिकीच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या ठिकाणाहून शहरातील संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात येणार आहेत.