कोरोना संसर्ग वाढत असतांना बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:34+5:302021-04-05T04:14:34+5:30
महामंडळातर्फेच नियमांना हरताळ : अनेक प्रवाशांचा विना मास्कही प्रवास ( रिऍलिटी चेक) फोटो : ०५सीटीआर ४१ लोकमत न्यूज नेटवर्क ...
महामंडळातर्फेच नियमांना हरताळ : अनेक प्रवाशांचा विना मास्कही प्रवास
( रिऍलिटी चेक)
फोटो : ०५सीटीआर ४१
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना, शासनातर्फे कठोर निर्बंध लावण्यात येत आहेत. असे असताना एस. टी. बस मध्ये मात्र याचे पालन होत नाही. एका बाकावर दोन ते तीन प्रवासी बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत असल्याचे ''लोकमत '' प्रतिनिधीने जळगाव आगारात केलेल्या पाहणीतून दिसून आले. असे असतांनाही महामंडळातर्फेही बस मध्ये मर्यादित न बसविता दाटीवाटीने प्रवासी बसविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारातून पहाटे पासूनच बस फेऱ्या सुरू होतात. सध्या कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी असली तरी वेळापत्रकाप्रमाणे काही गावांना बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, या बसेस मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसणे गरजेचे असतांना, दोन ते तीन प्रवासी बसत आहेत. तर क्षमतेपेक्षाही जास्त प्रवासी बसले असतांना उभे असलेले प्रवासी खाली न उतरता उभे राहूनच प्रवास करीत आहे. परिणामी यामुळे बसमध्ये चांगलीच दाटावाटी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जळगाव आगारातून बाहेर जाणाऱ्या बसेससह बाहेरील आगाराहून येणाऱ्या बसेस मध्येही अशीच परिस्थिती दिसून आली.
इन्फो :
या बसेसची केली पाहणी
लोकमत प्रतिनिधीने रविवारी दुपारी जळगाव आगारात बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या विविध बसेसची पाहणी केली. यात एम एच २० बी एल ०६९९ या जळगाव ते धुळे बस मध्ये प्रवाशांची बसमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे अनेक प्रवासी मास्क काढून गप्पा मारताना दिसून आले. तसेच एम एच ४० एन ९८४३ या औरंगाबादहून चोपडाकडे जाणाऱ्या बसेस मध्येही एका बाकावर दोन-दोन प्रवासी बसलेले दिसून आले. तसेच एमएच १४ बीटी २०२४ ही बसही पाचोऱ्याहून प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल भरून आलेली दिसून आली. या बसमध्येही अनेक वयोवृद्ध प्रवासी विना मास्क प्रवास करतांना दिसून आले.
इन्फो :
तर प्रवासी सांगूनही ऐकत नाही
जळगाव आगारातील बाहेर गावी जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या अनेक बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन किंवा अनेक प्रवासी मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. याबाबत लोकमत प्रतिनिधीने या बसेसवरील काही वाहकांना विचारले असता, महामंडळातर्फे एका सीटवर प्रवासी बसविण्याबाबत सध्यातरी कुठलेही आदेश नाहीत. त्यामुळे एका सीटवर दोन प्रवासी बसतात. मात्र, गर्दी झाल्यावर एका सीटवर काही ठिकाणी तीन तीन प्रवासी बसतात. तसेच बस फुल्ल झाल्यावरही नागरिक ऐकत नसून, बस मध्ये गर्दी करतात. जास्त बोलले तर वाद होण्याची शक्यता असते. तसेच मास्क वापरण्या बाबत प्रवाशांना वारंवार सांगत असतो, तरीही प्रवासी तेवढ्या पुरता मास्क लावतात. नंतर मात्र काढून टाकतात. त्यामुळे प्रवाशांना कुठल्या भाषेत समजावे, हे समजत नसल्याचे वाहकांनी ''लोकमत'' शी बोलतांना सांगितले.
इन्फो :
महामंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सतत योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असते. यातील काही प्रवासी नियमांचे पालन करतात तर काही करीत नाही. सध्या शासनातर्फे एका सीटवर एक प्रवाशी बसविण्याबाबत कुठलीही सुचना नाही.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी