कोरोनाचा संसर्ग कमी, प्रशासनाकडून वाढल्या अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:27+5:302021-07-07T04:19:27+5:30

कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळत आहे. याचा सर्वात मोठा आधार रोजंदारी करणाऱ्यांना तसेच विविध व्यावसायिकांना होणार ...

Corona infection low, increased expectations from administration | कोरोनाचा संसर्ग कमी, प्रशासनाकडून वाढल्या अपेक्षा

कोरोनाचा संसर्ग कमी, प्रशासनाकडून वाढल्या अपेक्षा

Next

कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळत आहे. याचा सर्वात मोठा आधार रोजंदारी करणाऱ्यांना तसेच विविध व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने सर्वांच्याच प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. लवकरात लवकर निर्बंध शिथिल करीत व्यवहार पूर्वपदावर यावे, असे सर्वांनाच वाटत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना यश येत असल्याने आता प्रशासनानेच सामान्यांच्या रोजंदारीचाही विचार करावा, असा सूर आता उमटू लागला आहे. मात्र हे करीत असताना गर्दीवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाची जेवढी जबाबदारी राहणार आहे, तेवढीच व्यावसायिक, कामगार, सामान्य नागरिक यांचीही जबाबादारी राहणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर उसळलेली गर्दी किती घातक ठरली हे सर्व जिल्हावासीयांनी अनुभवले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यापासून संसर्ग ‌‌वाढत गेल्याने एप्रिल महिन्यापासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर १ जूनपासून काहीसी शिथिलता मिळाली व ७ जूनपासून अनलॉक होऊन सर्वच व्यवहार सुरू झाले. मात्र डेल्टा प्लसने घात केला. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून निर्बंध लागू झाले. यामुळ‌े विविध व्यवसायांवर परिणाम होण्यासह रोजंदारी करणाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता आठवडाभरातील स्थिती पाहता मोठे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत असून रिकव्हरी रेटदेखील वाढत जाऊन ९७.९१ टक्क्यांवर पोहचला आहे. यामध्ये गेल्या रविवारपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान रुग्णसंख्या कमी-कमी होत जाऊन आठवड्याभराच्या तुलनेत रुग्णसंख्या १४ टक्क्यांवर आली आहे तर पॉझिटिव्हिटी केवळ ०.२० टक्क्यांवर आहे. प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी वेळोवेळी निर्बंध लागू केले. त्यानंतर आता स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याने प्रशासनाचे यश पाहता प्रशासनानेच योग्य उपाययोजना करीत निर्बंध शिथिल करण्याची अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे. तसे पाहता राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले असले तरी कोरोना संसर्गाच्या पाच टप्प्यातील पहिल्याच टप्प्यात जळगाव जिल्हा असला तरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने जळगाव जिल्ह्याचा राज्य सरकारने तिसऱ्या टप्प्यात समावेश केला. आता जिल्ह्यातील स्थिती सुधारत असल्याने राज्य सरकारनेही या विषयी विचार करावा. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात मोठा तुटवडा निर्माण झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण स्वत:च्या नियंत्रणाखाली केल्याने तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनची माहिती, उपलब्धता याविषयी माहिती देण्याच्या दिलेल्या सूचना पाहता योग्य उपाययोजना होऊन स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत झाली. त्यामुळेच आता जिल्हावासीयांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

Web Title: Corona infection low, increased expectations from administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.