कोरोनाच्या इंजेक्शन्सचा जिल्हाभरात तुटवडा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:41 PM2020-07-20T12:41:42+5:302020-07-20T12:42:00+5:30
एकाही औषधी दुकानावर उपलब्ध नाही : शासनाच्या यादीनुसार तपास केल्यावर वास्तव समोर
जळगाव : कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणांची यादी अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे़ मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी चौकशी केली असता, हे इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले़ पाच पैकी चार मेडिकलवरून नकार देण्यात आला. एका मेडिकलवर मात्र, सविस्तर माहिती विचारून शेवटी औषधी नसल्याचे सांगण्यात आले़ ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये प्रशासनाचे दावे व वास्तव समोर आले आहे़
कोविड बाधित व अत्यवस्थ रुग्णांसाठी रेमडेसीवीर हे इंजेक्शन देण्यात येते़ शासकीय पातळीवर अद्याप हे इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही़ खासगी पातळीवरही ते उपलब्ध असल्यावर मर्यादा आल्या आहेत़
यादीतील १ व्यक्ती : (रुग्णालय)
प्रतिनिधी : कोरोनाचे इंजेक्शन आहेत का ?
उत्तर : मी एकदम बीझी असून माझ्याकडे रुग्णांचा लोड खूप आहे़ शंभर पेशंट आहेत़ मी सांगू शकत नाही़
यादीतील २ व्यकती (मेडिकल)
कोरोनाचे इंजेक्शन आहेत का ?
उत्तर : अहो मालच नाही़़़तुम्हाला कोणते हवे होते़
प्रतिनिधी : रेमडेसीवीर
उत्तर : अंननननऩ़़ दोन दिवसांनी फोन करून बघा, साडे पाच हजाराचे एक इंजेक्शन असून पेंशटला ११ द्यावे लागतात़
प्रतिनिधी : आठवडाभरात मिळेल का
उत्तर : सांगता येत नाही़ कंपनीकडूनच पुरवठा होत नाहीय
यादीतील व्यक्ती ३ (मेडिकल)
प्रतिनिधी : कोरोनाचे इंजेक्शन मिळतील का
उत्तर : तुम्ही कोण? डॉक्टर की पेशंट
प्रतिनिधी : आमचे रुग्ण आहेत़
उत्तर : पॉझीटीव्ह आहेत का? कुठे दाखल आहेत़
प्रतिनिधी : सिव्हीलला न्यायचे आहे़
उत्तर : आधीच कसे इंजेक्शनचे नियोजन करताय, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले आहे का
प्रतिनिधी : नाही, पण तुमच्याकडे मिळतील का
उत्तर : असे नाही, तुम्ही सांगत नाहीय कोण आणि औषधी मागताय़
यादीतील ४ व्यक्ती (मेडिकल)
प्रतिनिधी : तुमच्याकडे कोरोनाचे इंजेक्शन मिळेल का?
उत्तर : नाही़ तुटवडा आहे़ वरुनच कमी येते, त्यामुळे जे पहिले येतात...त्यांना ते दिल जाते.
प्रतिनिधी : कधी मिळतील ?
उत्तर : नाही सांगता येत पण तुम्हाला काही दवाखान्यात (दोन रुग्णालय व एका मेडिकलचे नाव सांगितले) भेटेल आमच्याकडे अजून आले नाही़
ही इंजेक्शन मिळणे सोयीचे व्हावे म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी राज्यभरातील ठिकाणांची यादी जाहीर केली असून यात जळगावातील एक रुग्णालय व पाच औषधी विक्रेत्यांची नावे आहेत़