कोरोना : जळगाव जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती मागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:08 PM2020-03-15T12:08:22+5:302020-03-15T12:08:52+5:30
दोन महिन्यातील कार्यक्रमांची माहिती मागविली
जळगाव : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांकडून मागविली आहे.
कोरोनाचा महाराष्ट्रातही प्रवेश झाला असल्याने सरकारी पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला कोरोना आजाराला तोंड देण्यासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरही प्रशासकीय यंत्रणांच्या बैठका सुरू असून अद्यापपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नसला तरी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दोन महिन्यातील कार्यक्रमांची माहिती मागविली
कोरोना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, स्नेहसंमेलने, प्रदर्शने, सार्वजनिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम यासंदर्भात माहिती मागविली आहे. तसे पत्रदेखील जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त आपत्ती व्यवस्थापन समिती आपत्ती कार्य करीत असून जिल्ह्यातील आरोग्य, गृह, जिल्हा परिषद, मनपा, अन्न औषध प्रशासन, महसूल इत्यादी विभागाला कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.