कोरोनाने आई गमावली, आजी हरवली, वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:45 AM2020-06-09T11:45:10+5:302020-06-09T11:45:25+5:30
पुण्यात स्थायिक तरुणाची अंगावर शहारे आणणारी कहाणी : शासन मृतांमध्ये संख्या वाढवेल.. आईची माया कोण भरुन देणार ..?
आनंद सुरवाडे ।
जळगाव : चार दिवसांपासून कोरोना बाधित असलेली आजी रुग्णालयातून गायब आहे, मात्र, यंत्रणेकडून कुठलेही ठोस उत्तर समोर येत नाही़त. वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनामुळे आधी आई गमावली़़़आता आजी हरवली़ शासनाचे काय ते केवळ मृतांमध्ये एक आकडा वाढवतील आमचं कुटुंबच उद्धवस्त होत आहे, याला जबाबदार कोण? असा सवाल आजी हरवलेल्या तरुण नातवाने यंत्रणेला विचारला आहे़ त्यांनी ही व्यथा ‘लोकमत’कडे मांडत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
मुळचा न्हावी ता़ यावल येथील रहिवासी असलेला हा तरूण पुण्यात कामानिमित्त स्थायिक आहे़ आई-वडील व आजी भुसावळ येथे राहत होते़ पत्नी गर्भवती असल्याने अशा परिस्थिती या तरूणाला बाहेर कुठे निघता येत नाही़ अशा स्थितीतच आई-वडीलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले़ आईला सुरूवातील तीन दिवस कसलीही लक्षणे नव्हती़ त्यानंतर लक्षणे दिसायला लागली मात्र, भुसावळच्या रेल्वे हॉस्पीटलमध्ये कुणीही लक्ष दिले नाही, आई एकवेळा बाथरुममध्ये पडली, स्वत: उठून जागेवर आली परिस्थिती अगदीच गंभीर झाल्यानंतर मग जळगावला हलविण्यात आले़
गंभीर प्रश्न... आजीची प्रकृती गंभीर होती म्हणूनच तीला जळगावात पाठविण्यात आले़ अशा स्थितीत ती जाणार कुठे व किती लांब. सीसीटीव्ह बघून तपास का लावला जात नाही, चार दिवस कसली वाट बघत होते, मृतदेह देताना घोळ झाल्याचा संशय आहे, तसे यंत्रणेने मान्य करावे, आम्हाला सांगावे, किती दिवस झुलवत ठेवणाऱ़़अशी हाक या नातवाने दिली आहे.
जळगावात उपचार नाकारल्याने नाशिकला हलविले
यात भर म्हणून की काय वडिलांनाही कोरोना झाल्याचा अहवाला आला. वडिलांचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला, मात्र, त्यांना अशक्तपणा अधिक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात काही दिवस दाखल करावे, अशी विनंती आम्ही केली मात्र, नकार देत चौदा दिवस घरीच थांबा असे डॉक्टरांनी सांगितले़ कुणीही दाखल करून घेण्यास तयार नसल्याने अखेर नाशिकच्या खासगी रुग्णालयात आम्ही वडीलांना हलविले व तेथे सुरळीत उपचार सुरू असल्याचे या तरूणाने सांगितले़
जळगावातील कोविड रुग्णालयात आणल्यानंतर आयसीयू फुल असल्याचे सांगत दुसऱ्या कक्षात शक्य तेवढे बाहेरच उपचार करू.. असे सांगण्यात आले. मात्र, तेव्हा हातात काही नव्हते व अखेर आईला मृत घोषित करण्यात आले त्यातच २ जूनपासून ८२ वर्षीय आजी हरविल्याचे समजले व हादरलो़़़ नियंत्रण कक्षात फोन केल्यावर तुमची तक्रार वेगळी आहे़ थेट ‘डिन’ला भेटा तेच सांगू शकतील असे उत्तर मिळाले़़़अशी माहिती या तरूणाने दिली आहे़
आठवडाभरापासून बेपत्ताच... ८२ वर्षीय ही बाधित महिला आठवडाभरापासून बेपत्ताच असून अजुनही या महिलेचा शोध लागलेला नाही़ आम्ही तात्काळ पोलिसांना कल्पना दिली होती़ सीसीटीव्ही सुरू आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी माध्यमांना दिली होती़