कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:01+5:302021-07-04T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात शाळा बंद असल्याने गेल्या सव्वा वर्षापासून लहान मुले घरात असून संसर्गाच्या भीतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात शाळा बंद असल्याने गेल्या सव्वा वर्षापासून लहान मुले घरात असून संसर्गाच्या भीतीने त्यांचे बाहेर फिरणेही कमी झाले आहे. यात घरामध्ये एकाच ठिकाणी बसून राहत टीव्ही, मोबाइल पाहत खाण्याचेही प्रमाण वाढल्याने ही मुलं लठ्ठ होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. यासाठी पालकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला आणि मार्च २०२०पासून शाळा बंद झाल्या. तेव्हापासून मुले घरातच आहे. शाळा बंद असण्यासह कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुलांना घराबाहेर पडणेही बंद झाले. याचा परिणाम म्हणजे मुले घरातच राहू लागली. हळूहळू मुलांना घरात एकाच ठिकाणी बसण्याची सवय लागली. यात काही काम नाही म्हणून ते टीव्ही, मोबाइल पाहत असल्याने एकाच ठिकाणी जास्त वेळ बसण्याचे त्यांचे प्रमाण वाढले व आता ती जणू सवयच होऊन गेली आहे.
घरात एकाच ठिकाणी बसून काही ना काही खात राहत असल्यानेदेखील मुलांचे वजन वाढत आहे. त्यात मुलांना नेहमी-नेहमी काय द्यायचे म्हणून घरात तयार पदार्थही आणून ठेवले जात असल्याने मुलांच्या खाण्यामध्ये जंक फूडचेही प्रमाणह वाढले आहे. त्यात टीव्ही समोर बसून खात असल्याने खाण्याकडे लक्ष राहत नाही यामुळे त्यांचे समाधान होत नाही व मुले सातत्याने खात राहतात. बाहेर खेळणे बंद असल्याने शारीरिक हालचालीही कमी झाल्याने मुलांचे वजन वाढून ते लठ्ठ होत असल्याचे सांगितले जात आहे.
वजन वाढले कारण.....
- घरात एकाच ठिकाणी बसून राहण्याचे प्रमाण वाढल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या.
- घरातच राहत असल्याने सातत्याने काही ना काही खात राहण्याची मुलांना सवय लागली.
- टीव्ही, मोबाइल पाहत एकाच ठिकाणी बसण्याचा मुलांचा वेळ वाढला असून यामुळे स्थूलपणा वाढत आहे.
- कोणतेही पदार्थ खात असताना अर्धे लक्ष टीव्हीत असते तर अर्धे लक्ष खाण्यात असते. त्यामुळे मुलांचे समाधान होत नाही व ते सतत खात राहतात.
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
- मुलांना एकाच ठिकाणी लागलेली बसण्याची सवय दूर करा, त्यांना फिरायला सांगा.
- खाद्य पदार्थ देताना मुलांना टीव्ही पाहू देऊ नका, मोबाइलपासून दूर ठेवा.
- मुलांना जंक फूड देण्याऐवजी ज्वारीच्या, मक्याच्या लाह्या द्या, गूळ-शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा लाडू, शेवया असे पदार्थ द्या. नूडल्स देताना त्यात भाज्यांचे प्रमाण अधिक असावे, ब्रेडचे सॅण्डविच देताना त्यात काकडी व इतर फळांचे प्रमाण अधिक ठेवा.
मुले टी.व्ही. सोडतच नाहीत
गेल्या सव्वा वर्षापासून मुले घरीच असल्याने ते सातत्याने टीव्ही समोर असतात. टीव्ही सोबतच त्यांना मोबाइलवर खेळण्याचीही सवय लागली आहे. शरीराची हालचाल होत नसल्याने त्यांचे वजन वाढत आहे.
- संजय कुलकर्णी, पालक.
मुलांना बाहेर नेणे बंद तर केलेच आहे, शिवाय शाळाही बंद असल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली होत नाही. त्यात घरात मुलं सतत टीव्हीसमोर बसून राहत असल्याने त्यांचे वजन वाढत आहे.
- राजेंद्र पाटील, पालक.
लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात
लहान मुलांचे बाहेर फिरणे, खेळणे या काळात बंद झाल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. घरात एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहत असल्याने व सतत काही ना काही खात असल्याने मुलांचे वजन वाढत आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांना व्यायाम करण्याविषयी सांगण्यासह त्यांच्या शारीरिक हालचाली वाढविण्यावर भर दिला पाहिजे.
- डॉ. राजेंद्र पायघन, बालरोग तज्ज्ञ
गेल्या अनेक दिवसांपासून मुले घरातच असल्याने टीव्ही पाहता-पाहता त्यांना खाण्याची सवय लागली आहे. मुलांना बाहेरील तयार पदार्थ देण्याऐवजी घरगुती खाद्य पदार्थ खाण्यास द्यावे. मुलांच्या शारीरिक हालचाली वाढविणे गरजेचे आहे.
- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ