कोरोना : मंगल कार्यालय, लॉन्स, विवाह सभागृही राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:40 PM2020-03-20T12:40:11+5:302020-03-20T12:45:14+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत लग्न समारंभाच्या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल अथवा अन्य वास्तूंमधील विवाह सभागृह (मॅरेज हॉल) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. १९ मार्चपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश असून पुढील आदेशापर्यंत ही ठिकाणे बंद राहणार आहेत. याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्व यात्रा व उत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या तसेच राज्याच्या विविध भागातून येत असतात. अशाच प्रकारे लग्न समारंभ व इतर समारंभांसाठीदेखील वेगवेगळ््या भागातून नागरिक येत असतात. या सर्व नागरिकांची पूर्व तपासणी करणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल अथवा अन्य वास्तूंमधील विवाह सभागृह (मॅरेज हॉल) व विवाहस्थळावर होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून हे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी १९ रोजी काढले. पुढील आदेशापर्यंत ही ठिकाणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.