कोरोना पाॅझिटीव्ह १५ रुग्णांनी ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:11 PM2021-03-15T16:11:37+5:302021-03-15T16:19:08+5:30
पळासखेडे बुद्रुक, ता. जामनेर येथील कोविड सेंटरमधील पंधरा रुग्णांनी कंटाळून गावाकडे धूम ठोकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : पळासखेडे बुद्रुक, ता. जामनेर येथील कोविड सेंटरमधील असुविधेबाबत काही रुग्णांनी तक्रार केली असून पंधरा रुग्णांनी कंटाळून गावाकडे धूम ठोकली.
जेवण, औषधी वेळेवर मिळत नाही. निकृष्ठ दर्जाचे जेवण, स्वच्छतेचा अभाव, पाणी नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी सोमवारी सकाळी रुग्णांकडून केल्या जात होत्या. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी कोविड सेंटरमधुन १५ रुग्ण निघून गेल्याची तक्रार पोलीसात दिली. यात जामनेरचे ५, सवतखेडे, चिंचखेडे येथील प्रत्येकी २, नेरी, वाकी, गारखेडे, वाकडी, कुर्हा व केकतनिंभोरे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. माहिती मिळताच डॉ. सोनवणे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णाशी चर्चा केली. तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी माहिती घेतली.
पळासखेडे कोवीड सेंटरमध्ये ४५ रुग्णांवर उपचार सुरु असुन आरोग्य विभागाकडुन नियमीत तपासणीसह औषधी दिली जातात. प्रशासनाकडुन जेवणासह इतरही सुविधा पुरवल्या जातात. रुग्णांनी सहकार्य केले पाहीजे.
संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसींग पाळण्याबरोबरच मास्कचा वापर आवश्यक आहे.
-डॉ. विनय सोनवणे, नोडल ऑफिसर, जामनेर