कोरोना रुग्णालयाच्या अनागोंदीने गाठला कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:36 PM2020-06-19T12:36:12+5:302020-06-19T12:36:46+5:30
अनेक गंभीर प्रकार प्रशासनापासून लपविले
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यासह मृत्यूचेही प्रमाण वाढत असताना कोरोना रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार घडले. हे प्रशासनापासून लपवून ठेवण्याचे गंभीर प्रकार रुग्णालयात घडल्याचे समोर येत आहे. या संदर्भात व्यवस्थेत बदल करण्याच्या सूचना देऊनही त्याकडे लक्ष दिले न गेल्याने कोरोना बाधित मालती नेहेते या वृद्धेच्या मृत्यूसह अनेकांना जीव गमवावा लागल्याचीही वेळ या अनागोंदीने आल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यासह कोरोना बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने राज्यस्तरावरून उपाययोजना केल्या जात आहे. सोबतच स्थानिक प्रशासनाच्या सूचनाही दिल्या गेल्या. मात्र रुग्णालयाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप होऊ लागला. याचा प्रत्ययही अनेक घटनांवरून येऊ लागला.
अहवाल पॉझिटीव्ह असताना दुर्लक्ष
रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृतावस्थेत आढळून आलेल्या कोरोना बाधित मालती नेहेते यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने व वय जास्त असण्यासह त्यांच्या प्रकृतीचा विचार केला गेला नाही व त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले. कोरोना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच या वृद्धेचा अहवाल पॉझिटीव्ह असताना व परिस्थिती पाहता त्यांना आयसीयूमध्ये न ठेवता सात क्रमांकाच्या कक्षात ठेवण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
तीन मृत्यू, प्रशासन अनभिज्ञ
नऊ दिवसांपासून बेपत्ता कोरोना बाधित मालती नेहेते या वृद्धेचा रुग्णालयाच्या शौचायलायत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आदी रुग्णालयात पोहचले. त्यावेळी या महिलेच्या मृत्यू पूर्वीदेखील तीन कोरोना बधितांचा स्वच्छतागृहात जाताना मृत्यू झाल्याचे समोर आले. एवढा गंभीर प्रकार घडलेला असताना या विषयी रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला कळविले नाही.
यात या तीन मृत्यूंसह मालती नेहेते ही वृद्धा बेपत्ता असण्याविषयीदेखील प्रशासन अनभिज्ञ होते. कोरोना बाधित मालती नेहेते या रुग्णालयातून बेपत्ता झाल्यानंतर या विषयी रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाला न कळविता केवळ वृद्धेच्या केस पेपरवर ‘पोलीस कॉन्स्टेबलला कळविले’ असा उल्लेख असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या रुग्णालय भेटी प्रसंगी समोर आले होते.
जबाबदारीची जाण न ठेवल्याने अधिकाऱ्यांना भोवले
कोरोना रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयातील व्यवस्थेत सुधारणा करण्याविषयी प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या. मात्र या कडे लक्षच दिले गेले नाही, अशी माहितीही मिळाली. सूचनांचे पालन न झाल्याने रुग्णांचे हाल तर झालेच सोबतच अनेकांना जीवही गमवावा लागला. या खेरीज हे गंभीर प्रकार अंगलट येऊन अधिकाºयांवर अखेर निलंबनाची कारवाई झाली. या सोबतच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचीदेखील बदली झाली.
कारभारावर प्रश्नचिन्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार ढेपाळत चालल्याने त्याच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे कोविड रुग्णालय डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. हे टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी या ठिकाणी २०० वाढीव आॅक्सिजन बेडची व्यवस्था करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या पूर्वीच सांगितले आहे.
कारभाराबाबत प्रचंड नाराजी
कोविड रुग्णालयाच्या कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोनाबाधित वृद्धा बेपत्ता असताना या बाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती न देणे, या बाबत केवळ एका पोलीस कर्मचाºयाला दूरध्वनीवरून कळविल्याचे केस पेपरवरून लिहून ठेवणे, तीन जणांच्या स्वच्छतागृहात जात असतानाच मृत्यू झाल्याची माहितीही लपवून ठेवणे, सूचनांकडे दुर्लक्ष असे गंभीर प्रकार असतानाही प्रमुख याकडे लक्ष देत नसतील तर कारभार कसा चालणार, असा सवाल त्या वेळीच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थित करीत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.