कोरोनामुळे गंभीर गुन्हे घटले; किरकोळ वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:08+5:302021-04-01T04:17:08+5:30
वार्तापत्र क्राईम सुनील पाटील सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. जळगाव जिल्हा टॉप टेन मध्ये आहे. ...
वार्तापत्र क्राईम
सुनील पाटील
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. जळगाव जिल्हा टॉप टेन मध्ये आहे. आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणा कोरोना आजारावरील उपाययोजना व कार्यवाहीच्या अंमलबजावणीत गुंतलेल्या आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील क्राईम मात्र घटलेला दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, दंगल व रस्ता लूट यासारखे गंभीर गुन्हे घटलेले आहेत. दुसरीकडे दुचाकी व मोबाईल चोरीच्या घटना मात्र मोठ्या संख्येने वाढलेल्या आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीन मुले जास्त दिसून आले. चालत्या दुचाकीवरून पायी जाणाऱ्या लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये खासकरून लहान मुलांचा सहभाग दिसून आला. कायद्याची कमजोरी म्हणा किंवा मौजमजा यासाठी ही मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. मुख्य रस्ता, तसेच काॅलनी भागांमध्ये या घटना होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी शनिपेठ व आता दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश केला. दोन वर्षांपूर्वी विनयभंग, बाललैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या अधिक होती. शनिपेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलांची टोळी पकडल्यानंतर काही दिवसांतच ही मुले पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाली होती. कायद्यामुळे अटक करणे शक्य होत नसल्याने त्याचा गैरफायदा या पिढीकडून घेतला जात असल्याचे काही घटनांवरून दिसून आले. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे असलेला कल हा समाजासाठी घातक ठरला आहे. यासाठी पालकांनीच अधिक दक्ष व जागृत असणे गरजेचे आहे.