कोरोना अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना सोडले : आमदार चंद्रकांत पाटील यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:29 PM2020-05-02T21:29:20+5:302020-05-02T21:31:17+5:30
५२ रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सोडून दिले.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : ५२ रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सोडून दिले. यातून अनेक जण बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी रुग्णालयांमध्ये २०० खाटांची व्यवस्था असताना व केवळ १०५ रुग्ण दाखल असतानादेखील ५२ रुग्णांना स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच सोडून दिले. ३० एप्रिल रोजी हा प्रकार घडला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी कोणताही विचार न करता सर्व ५२ रुग्णांना बाहेर सोडून दिले व त्यातील भुसावळ येथील दोन रुग्णांचे रात्री आठ वाजता विषाणूचा संसर्ग झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. भुसावळ येथील दोन्ही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र शहरात दहशतीचे वातावरण पसरले. या रुग्णांना भरती ठेवले असते तर कदाचित इतर लोक त्यांच्या संपर्कात आले नसते. हा भोंगळ कारभार आहे. यासंदर्भात तक्रार मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तत्काळ तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असून दोन दिवसात अहवाल मागितला असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.