चक्रीवादळात अडकले कोरोना अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:21 AM2020-06-06T11:21:53+5:302020-06-06T11:22:08+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रुग्णांचे अहवाल २४ तासात आलेच पाहिजे, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रुग्णांचे अहवाल २४ तासात आलेच पाहिजे, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आणि त्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच खाजगी लॅबला चक्रीवादळाचा फटका बसण्यासह तेथील तीन तंत्रज्ञांना कोरोनाची लागण झाल्याने जळगाव जिल्ह्यातील अहवाल येण्यास दोन दिवस विलंब झाला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या लॅबमधून दररोज १५० ते १६० नमुने तपासले जात असून तेवढेच अहवाल येत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता मुंबईनंतर आता पुणे येथीलही एका खाजगी लॅबशी करार करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून प्रयोगशाळेवर ताण येऊ लागल्याने व अहवालासही विलंब होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लॅब सुरू करण्यासह मुंबई येथील खाजगी लॅबशी करार करण्यात आला. या सोबतच आता पुणे येथीलही एका खाजगी लॅबशी करार करण्यात आला आहे. अहवाल लवकर मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे आता गेल्या दोन-तीन दिवसात या अहवाल प्रक्रियेस निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.
तंत्रज्ञांना लागण
ज्या खाजगी लॅबशी करार करण्यात आला त्या लॅबच्या तीन तंत्रज्ञांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे तपासणीही रखडली. एकीकडे चक्रीवादळामुळे पाण्याचा वेढा, लॅब हलविण्याची लगबग व तंत्रज्ञांना झालेल्या कोरोनाच्या बाधेने कर्मचाऱ्यांची कमतरता या सर्व प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यातील जवळपास ५०० अहवाल तेथे रखडले. त्यातील काही अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून उर्वरित अहवालही लवकरच मिळतील, असे सांगण्यात आले.
लॅब इतरत्र हलविली
मुंबई येथील खाजगी लॅबमध्ये रुग्णांचे अहवाल पाठविले असताना चक्रीवादळ आले व त्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे या लॅबलाच पाण्याचा वेढा पडला. त्यामुळे ही लॅब इतरत्र हलविण्याची वेळ आली. त्यामुळे अहवाल रखडले.
पुणे येथील लॅबशी करार
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढून तापसणीसाठी येणाºया नमुन्यांचेही प्रमाण वाढल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मुंबई येथीलही लॅबवर ताण आल्यास पुणे येथील एका खाजगी लॅबशी करार करण्यात आलेला आहे. दोन्ही ठिकाणी पहिल्या दोन्ही ठिकाणी ताण वाढल्यास या तिसºया लॅबकडे नमुने पाठविण्यात येऊन त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
१८० पर्यंत झेप
धुळे येथील लॅबवर ताण येऊ लागल्याने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लॅब सुरू करण्यात आली. या लॅबमध्ये दररोज १५० ते १६० नमुन्यांची तापसणी होत असून तेवढेच अहवाल प्राप्त होत आहेत. या लॅबमध्ये एका दिवसात सर्वाधिक १८० अहवालाची नोंद झाली आहे.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॅबमध्ये दररोज १५० ते १६० नमुने तपासले जात असून तेवढेच अहवाल येत आहेत. या लॅबने एका दिवसात १८० अहवालापर्यंत झेप घेतली आहे. जास्त नमुने असल्यास या लॅबसह खाजगी लॅबची मदत घेऊन २४ तासात अहवाल मिळविले जात आहे. त्यात आता आणखी एका खाजगी लॅबशी करार करण्यात आला आहे.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक