डॉक्टरांनीच घ्यावे कोरोनाचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:33+5:302021-04-10T04:15:33+5:30
जळगाव : कोरोना तपासणी केंद्रांवर जिल्ह्यात आरोग्य सेवकांमार्फत कोरोना चाचणी नमुने घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून ते ...
जळगाव : कोरोना तपासणी केंद्रांवर जिल्ह्यात आरोग्य सेवकांमार्फत कोरोना चाचणी नमुने घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून ते तातडीने थांबवावे व तज्ज्ञ डॉक्टर किंवा तंत्रज्ञांमार्फतच हे नमुने घेण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले आहे.
आरोग्य सेवकांना नमुने घेण्याचे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नसून आरोग्य सेवकाने एका दिवसाला शंभर ते दोनशे नमुने घ्यावेत, असे तोंडी आदेश दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवक भीती व दडपणाखाली काम करत आहेत. कोरोना चाचणी नमुने तज्ज्ञांच्या हस्ते घ्यावे, असे आरोग्य विभागाने आदेश काढलेले आहेत, मात्र या बाबत निष्काळजीपणा होत असल्याचे ॲड. देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी कोरोनासारख्या गंभीर विषयावर आरोग्य सेवकांना तोंडी आदेश देऊन काम करून घेत आहेत. याबाबत आरोग्य सेवकांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.