कोरोनामुळे कोंडलेला अत्तर व अगरबत्तीचा सुगंध दरवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:54+5:302021-01-17T04:14:54+5:30
जळगाव : कोरोना संसर्गाचा फटका लहान-मोठ्या उद्योग व्यवसायांना बसला असताना, अत्तर व अगरबत्ती व्यावसायिकांनाही बसला. मात्र, अनलाॅकनंतर हा व्यवसाय ...
जळगाव : कोरोना संसर्गाचा फटका लहान-मोठ्या उद्योग व्यवसायांना बसला असताना, अत्तर व अगरबत्ती व्यावसायिकांनाही बसला. मात्र, अनलाॅकनंतर हा व्यवसाय पूर्वपदावर येत असून, अत्तर व अगरबत्तीचा सुगंध बाजारपेठेत पुन्हा बहरला आहे. व्यावसायिकांकडे स्वदेशी कंपन्यांचे अत्तर व परफ्युमचे विविध ब्रॅण्ड उपलब्ध असले तरी, ग्राहकांकडून विदेशी कंपन्यांच्या परफ्युमलाच पसंती आहे.
परफ्युम, बॉडी स्प्रेच्या युगातही पारंपरिक अत्तराचे स्थान अजूनही कायम आहे. लग्न समारंभ, सण व इतर उत्सवकाळात अत्तर, परफ्युमला नागरिकांची मोठी मागणी असते. गेल्या वर्षी कोरोनामुळे या विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णत: ठप्प होता. बाजारपेठेत मिळेल त्या ठिकाणी टेबल लावून अत्तर, परफ्यूम विक्री करणाऱ्या लहान व्यावसायिकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांचा कोरोनाकाळात व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. कोरोनामुळे लग्न समारंभ बंद असल्यामुळे, या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, टप्प्या-टप्प्याने आता व्यवसाय पूर्वपदावर आला आहे.
इन्फो :
कोरोनामुळे लॉकडाऊन काळात व्यवसाय पूर्णत: बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता काही महिन्यांपासून व्यवसाय पूर्वपदावर येत असून, ग्राहकांची स्वदेशीपेक्षा विदेशी कंपन्यांच्या परफ्युमला मोठी मागणी आहे.
सैफुद्दीन भारमल, व्यावसायिक
इन्फो :
गुलाब, मोगरा अन् चंदनाच्या अगरबत्तीला सर्वाधिक पसंती
कोरोनाकाळात स्थानिक अगरबत्ती उद्योगांना चांगलीच झळ बसली. उद्योग बंद असल्यामुळे विशेषत: मजूरवर्गाचे चांगलेच हाल झाले. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, हा व्यवसायही दोन महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाला आहे. दरम्यान, काही वर्षांत अगरबत्तीच्या विविध ब्रॅण्डेड कंपन्यांनी नागरिकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे. मात्र, असे असले तरी बहुतांश नागरिकांनी या राष्ट्रीय ब्रॅण्डपेक्षा स्थानिक कंपन्यांनी तयार केलेल्या गुलाब, मोगरा अन् चंदनाच्या अगरबत्तीला सर्वाधिक पसंती देत आहेत. गुलाब, मोगरा, चंदन, केवडा, जाई-जुई या अगरबत्तीचे पॅकेट १० रुपयांपासून ते झिपर पाऊच ५० ते ६० रुपयांपर्यंत मिळत आहे. ग्राहकांना परवडत असल्यामुळे बाजारपेठेत सध्या स्थानिक कंपन्यांच्या अगरबत्तीलाच मोठी मागणी असल्याचे व्यावसायिक जतीन अग्रवाल यांनी सांगितले.