‘कोरोना’चा भूकबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:35 PM2020-05-11T12:35:36+5:302020-05-11T12:35:48+5:30

भाकरीची चिंता : वडील, भावाचा रोजगार बंद झाल्याने व्याकूळ तरुणीची आत्महत्या

Corona starvation | ‘कोरोना’चा भूकबळी

‘कोरोना’चा भूकबळी

Next

जळगाव : जगभरात हाहाकार पसरविणाऱ्या कोरोना आजारामुळे दररोज कितीतरी जणांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे आजाराची लागण झालेली नसली तरी याच कोरोनामुळे नशिबी आलेल्या लॉकडाउनमुळे वडील, भावाच्या हातचा रोजगार गेला व घरात खायला काही नसल्याने व्याकूळ झालेल्या अनिता खेमचंद चव्हाण (१७, रा.रायसोनी नगर, मूळ रा.मध्य प्रदेश) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. कोरोनाचा हा भूकबळी कुटुंबासह सर्वांनाच चटका देणारा ठरत आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले व गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. याच लॉकडाउनमुळे घरात खायला नसल्याने अनिता चव्हाण या तरुणीने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली व संपन्न सुवर्णनगरीत कोरोनाचे भूकबळीही जात असल्याचे समोर आले.

- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटुंब मूळ मध्यप्रदेश येथील असून उदरनिर्वाह करण्यासाठी जळगावला आले आहेत. रायसोनी नगरात खेमचंद हे मुलगी अनिता व तीन मुले असे झोपडीत वास्तव्याला होते. बांधकामाच्या साईडवर मिळेल ते काम करुन दोन वेळचे जेवण मिळत होते. मात्र दोन महिन्यापासून लॉकडाउनमुळे हाताचे काम गेले. रोज शेजारी तसेच काही दाते जेवण,कधी धान्य देत होते. वडील, तीन भाऊ असा परिवार असल्याने रोज कोणाकडे जेवण मागणार यामुळे अनिताला प्रचंड नैराश्य आले होते. शनिवारी वडील बाहेर गेले होते तर लहान भाऊ गल्लीत खेळत होते. घरात किराणा लागणार असल्याने पैसे संपले होते. उसनवारीने किती मागणार असा प्रश्न तिला सतत सतावत होता. भाऊ किराणा दुकानावर गेला असता त्यावेळी अनिता हिने घरातील दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ दुकानावरुन परत आला असता हा प्रकार लक्षात आला. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी १०.२० वाजता मृत घोषीत केले.

मृत्यूनंतरही झाली अवहेलना
अनिता हिच्या मृतदेहाचे रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अनिता अविवाहित असल्याने तेथून मृतदेह नेरी नाका येथील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या दफनभूमीत नेण्यात आला. मात्र काही लोकांनी या जागेवर मृतदेहाची दफनविधी करण्यास नकार दिला. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या या कुटुंबावर नवीन संकट उभे राहिले. सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी पुढाकार घेऊन मृतदेह घरी नेला. तेथे विधी केल्यानंतर परत नेरी नाका स्मशानभूमीत आणून तेथे अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान, यावेळी मृतदेह नेणारा रथही उपलब्ध झाला नाही, त्यामुळे दोन तास मृतदेह ताटकळत ठेवण्यात आला. मंगला बारी यांनी स्वत:चे वाहन आणून त्यातून मृतदेह नेरी नाका येथे आणला.

- आईचे निधन, अनिताच बनली भावांची माता... अनिता हिच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनिता हिने घरातील कामांची जबाबदारी सांभाळली. लहान भावांसाठी तीच बहिण व आई अशी दोघं भूमिका पार पाडत होती. कामाचा व्याप वाढल्याने तिचे सातवी पर्यंत शिक्षण होऊ शकले. वडील व भाऊ मिळेत ते काम करुन घरात किराणा आणत होते, मात्र आता पोटाची खळगी भरायची कशी यामुळे कुटुंब चिंताग्रस्त होते. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे मंगला बारी यांनी सांगितले.

Web Title: Corona starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.