कोरोना राज्य निरीक्षक आढाव्यासाठी जळगावात येणार - खासदार रक्षा खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:32 PM2020-06-21T12:32:09+5:302020-06-21T12:33:09+5:30
पथकाच्या भेटीनंतरही स्थिती न सुधारल्यास केंद्राचे अधिकारी जिल्ह्यात
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकाने सूचविलेल्या उपाययोजनांनंतर जिल्ह्यात काय स्थिती आहे, याचा आढावा आठ दिवसानंतर पुन्हा या पथकाकडून घेतला जाणार आहे. तरीही संसर्ग व मृत्यूदर कमी झाला नाही तर केंद्राचे एक अधिकारी जळगावात येतील अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्मार्ट सिटी मिशनचे संचालक तथा व महाराष्ट्रातील कोविड संदर्भात निरीक्षण व उपाययोजनांवरील देखरेखीची जबाबदारी असलेले कुणालकुमार पुढील १५ दिवसात स्वत: येऊन आढावा घेणार आहेत, असेही रक्षा खडसे यांनी या वेळी सांगितले.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी ही माहिती दिली. या वेळी त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आपण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला ११ जून रोजी पत्र पाठवून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात माहिती दिली व जिल्ह्यात केंद्र सरकारचे निरीक्षण पथक पाठवावे अशी विनंती केली होती. तसेच जळगावचे काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी राहिलेले स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार यांची महाराष्ट्रातील कोविड संदर्भात निरीक्षण व उपाययोजना संदर्भात देखरेखीसाठी केंद्र्राने त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधून दोन अधिकाऱ्यांचे पथक पाठविणार असल्याचे सांगितले होते, असेही खडसे म्हणाल्या.
प्रशासनाने लोकप्रतिधींशी समनव्य साधून काम करावे
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी मिळून काम करायला पाहिजे. खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधूनच काम झाले पाहिजे, अशी सूचना खासदार खडसे यांनी बैठकीत मांडली. यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. या सोबतच गोदावरी रुग्णालय येथील कोविड सेंटर येथे आणखी दोन विशेष डॉक्टरांची नेमणूक करण्याच्या सूचना खासदार खडसे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराहून अधिक झालेली आहे. तसेच १० जून रोजी कोरोना बाधित वृद्ध महिला कोविड रुग्णालयाच्या शौचालयात मृतावस्थेत सापडल्यामुळे जिल्हयात संतप्त भावना पसरली होती, असेही त्यांनी नमूद केले.