प्रलंबित अहवाल वाढल्याने कोरोना तपासणी मोहीम थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:03+5:302020-12-23T04:13:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत व्यापारी तपासणी मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणावर अहवाल ...

Corona stopped the investigation campaign as pending reports increased | प्रलंबित अहवाल वाढल्याने कोरोना तपासणी मोहीम थांबविली

प्रलंबित अहवाल वाढल्याने कोरोना तपासणी मोहीम थांबविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत व्यापारी तपासणी मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणावर अहवाल प्रलंबित राहिल्याने फुले मार्केटची तपासणी मोहीम अखेर थांबविण्यात आली आहे. प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रलंबित अहवालांची संख्या ३५०० वर गेली आहे. मात्र, सद्य:स्थितीत रुग्णांच्या अहवालांना प्राधान्य दिले जाते, त्यांचे अहवाल २४ तासांच्या आत देण्याचे नियोजन असते, त्यानंतर व्यापारी, दुकानदार यांच्या नमुन्यांची टप्प्याटप्प्याने तपासणी होत असल्याची माहिती आहे. रुग्णांचे अहवाल वेळेवर दिले जात असल्याची माहिती सूक्ष्मजीवशास्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी दिली.

शहरातील दाणाबाजार आणि फुले मार्केटमधील सुमारे १२०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यात दाणाबाजारात २ तर फुले मार्केटच्या तीन दिवसांमधील तपासणीत पहिल्या दिवशी २ असे चार बाधित आढळून आले आहेत. दाणाबाजारातील ६० जणांच्या तपासणीचे अहवाल दहा दिवसांनंतरही प्राप्त झाले नाही, तर फुले मार्केटमधील दोन दिवसांच्या तपासणीचे अहवाल बाकी आहेत. मोठ्या प्रमाणात अहवाल बाकी असल्याने आता आधीचे अहवाल स्पष्ट झाल्यानंतरच या तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, फुले मार्केटमध्ये तीन ते चार जणांची तपासणी करण्याचे मनपाने नियोजन केले होते. मात्र, अहवाल वेळेवर मिळत नसल्याने ही मोहीम थंडावली आहे.

खासगी प्रयोगशाळेची मदत नाही

मध्यंतरी प्रयोगशाळेवरील भार वाढल्यानंतर काही नमुने धुळे, काही खासगी प्रयोगशाळांकडे पाठविले जात होते. मात्र, ही मोहीम असल्याने प्रशासनाने स्वत:हून ती राबविली असून अत्यावश्यक नसल्याने हे नमुने खासगी प्रयोगशाळा किंवा धुळे येथे पाठविण्यात येत नसल्याची माहिती आहे. सर्व भार हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रयोगशाळा आणि डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील प्रयोगशाळेवर आहे. दोघांची सरासरी क्षमता ही १ हजार अहवाल दिवसाचे इतकी असल्याची माहिती आहे.

Web Title: Corona stopped the investigation campaign as pending reports increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.