पाचोरा तालुक्यात कोरोनाचे वादळ शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:01+5:302021-06-06T04:13:01+5:30
अतिक्रमणावर हातोडा शहर कोरोनातून सावरत नाही, तोच व्यवसायाला सुरुवात झाली. मात्र, पाचोरा नगरपालिकेने पहिल्याच दिवशी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्यास ...
अतिक्रमणावर हातोडा
शहर कोरोनातून सावरत नाही, तोच व्यवसायाला सुरुवात झाली. मात्र, पाचोरा नगरपालिकेने पहिल्याच दिवशी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी पोलीस बंदोबस्तात शहरातील रस्त्यावरील हातगाड्या, फळ भाजी विक्रेते, टपऱ्या, चहा पानाची दुकाने, फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात सुरुवात केली आहे. यामुळे शहरात मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याने मोकळा श्वास घेऊन अतिक्रमणधारकांवर पालिकेने वचक बसविला आहे. दरम्यान, गेल्या ३ महिन्यांपासून हातावरचे पोट असलेले छोटे व्यावसायिक आता कुठे उद्योगाला लागले होते. मात्र, पालिकेने लगेच हातोडा उगारला. यामुळे आधीच हतबल झालेल्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. नगरपालिकेने छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवणे सुरू केले. मात्र, धनदांडग्यांच्या अतिक्रमणाला हात लावला नाही.
शॉपिंग कॉम्प्लेक्समधील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे. गाळेधारकांनी नागरिकांच्या वापराच्या फुटपाथवर कब्जा केला आहे, याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच बाबूराब मराठे कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारक दुप्पट जागा बळकावून अतिक्रमित जागेवर बिनधास्त व्यवसाय करीत असून याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तेथील अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवावी, अशी जनमानसात प्रतिक्रिया आहे.
बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ
भाजपची सत्ता असलेल्या या बाजार समितीला मुदतवाढ न देता राजकीय दुजाभाव करीत तीन पक्षांच्या आघाडी सरकारने अशासकीय प्रशासक मंडळात राष्ट्रवादी-३, शिवसेनेचे-३, कॉँग्रेस -१ असे सदस्य नेमले आहेत. यात माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रमुख प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेतर्फे मात्र नियुक्ती करताना निष्ठावंत जुन्या शिवसैनिकांना डावलून आयाराम गयारामांना संधी दिल्याने निष्ठावंत कमालीचे नाराज झाले आहेत. मात्र, सत्ता असल्याने कुणीही उघड बोलत नसून शिवसेनेच्या गोटात कमालीची नाराजी पहायला मिळत आहे. मात्र बाजार समितीच्या या अशासकीय प्रशासक नियुक्तीवरून राजकीय क्षेत्रात मोठी कुजबुज ऐकायला मिळत आहे.